Mhada Lottery: मुंबईत घर विकत घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण; म्हाडा 2000 घरांसाठी काढणार लॉटरी, पाहा लोकेशन आणि किंमत

Mhada lottery 2024: लवकरच मुंबईत म्हाडा दोन हजार घरांसाठी जाहिरात काढू शकते. म्हाडाचं घर घेण्याचं सर्वसामान्यांचे स्वप्न अखेर पूर्ण होणार आहे. म्हाडाच्या घरांची संपूर्ण माहिती जाणून घ्या. 

श्वेता चव्हाण | Updated: Apr 20, 2024, 12:55 PM IST
Mhada Lottery: मुंबईत घर विकत घेण्याचे स्वप्न होणार पूर्ण; म्हाडा 2000 घरांसाठी काढणार लॉटरी, पाहा लोकेशन आणि किंमत  title=

MHADA Housing lottery News in Marathi: मुंबईत घरांच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे मुंबईत स्वतःचे घर घेणे अनेकांसाठी स्वप्नवत वाटते. मुंबई शहर किंवा उपनगरात कमी खर्चात घर मिळावे ही प्रत्येकाची इच्छा असते. जर तुम्ही मुंबईत घर खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. योग्य दरात मुंबईत स्वत:चं हक्काचं घर विकत घेऊ शकता. कारण  महाराष्ट्र गृहनिर्माण क्षेत्र विकास प्राधिकरणाच्या (Mhada) मुंबईत सप्टेंबरमध्ये सुमारे दोन हजार घरांसाठी लॉटरी काढण्याची दाट शक्यता आहे. तसेच या लॉटरीमध्ये गोरेगाव येथील गृह प्रकल्पातील पॉश घरांचा समावेश असणार आहे. 

दरम्यान गेल्यावर्षी मुंबई मंडळाची लॉटरी काढण्यात आली होती. त्यामध्ये 4082 घरांसाठी 1.22 लाख लोकांनी अर्ज केले होते. ज्या अर्जदारांना सोडत काढता आली नाही त्यांच्यासाठी यंदा सुवर्णसंधी आहे. म्हाडाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील विविध भागातील तयार घरांची माहिती गोळा केली जात आहे. मुंबईत येत्या काही महिन्यांत जवळपास 2 हजार घरे तयार होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे या घरांची लॉटरीसाठी निवड करण्यात आली आहे. मुंबई बोर्डाच्या 2023 मध्ये जाहीर झालेल्या 4082 घरांच्या लॉटरींपैकी 150 घरांची विक्री झालेली नाही. गेल्या सोडतीत 196 अर्जदारांकडे एकापेक्षा जास्त घरे होती. नियमानुसार कोणताही अर्जदार एकापेक्षा जास्त घर घेऊ शकत नाही. त्यानंतर अर्जदारांनी घरे म्हाडाला परत केली. त्याचवेळी सुमारे 200 विजेत्यांच्या कागदपत्रांमध्ये त्रुटी किंवा चुकीची माहिती असल्याचे समोर आले. यानंतर प्रतीक्षा यादीतील लोकांनाही ही घरे वाटप करण्यात आली आहेत. सध्या केवळ दीडशे घरांची विक्री बाकी आहे.

तसेच गोरेगाव येथील म्हाडाच्या आधुनिक इमारतीतील सुमारे 332 घरांचाही लॉटरीत समावेश होणार असून, ही घरे उच्च व मध्यमवर्गीय असतील. उच्च वर्गाची घरे सुमारे 979 चौरस फूट आणि मध्यमवर्गीय घरे सुमारे 714 चौरस फूट असतील. उच्चवर्गीय घरांची किंमत अंदाजे 1.25 कोटी रुपये असून मध्यमवर्गीय घरांची किंमत अंदाजे 80 लाख रुपये आहे. म्हाडाने प्रथमच गोरेगावच्या इमारतींमध्ये जिम, स्विमिंग पूल आणि इलेक्ट्रिक चार्जिंग पॉइंटची व्यवस्था केली आहे. या घरांचे जवळपास 80% काम पूर्ण झाले आहे, सध्या काम अंतिम टप्प्यात आहे. दोन ते अडीच महिन्यांत घरे तयार होतील.

ही कागदपत्रे ठेवा तयार

मुंबईत स्वतःचे घर असावे असे प्रत्येकाचे स्वप्न असते. या लॉटरीत सहभागी होण्यासाठी अर्जदारांकडे 7 कागदपत्रे असणे बंधनकारक आहे.  लॉटरीची तारीख जाहीर होण्यापूर्वी, आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी अर्जदार आधार कार्ड, पॅन कार्ड, अधिवास प्रमाणपत्र, उत्पन्नाचे प्रमाणपत्र, शपथपत्र, जात प्रमाणपत्र आणि त्या प्रवर्गाचे प्रमाणपत्र तयार ठेवून म्हाडाच्या वेबसाइटवर नोंदणी करू शकतात.