Mumbai News : मध्य रेल्वेवर शुक्रवारपासूनच ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही ब्लॉकमुळं वाहतूक बंद

Mumbai News : मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई लोकलचा विस्तार करण्यासाठी सध्या काही प्रयत्न सुरु असण्यासोबतच प्रशासनाकडून वेळोवेळी ही यंत्रणा सुस्थितीत ठेवण्यासाठीची पाहणी करण्यात येते.   

सायली पाटील | Updated: May 10, 2024, 09:52 AM IST
Mumbai News : मध्य रेल्वेवर शुक्रवारपासूनच ब्लॉक; पश्चिम रेल्वेवरही ब्लॉकमुळं वाहतूक बंद  title=
Mumbai local train mega block on central and western railway latest update

Mumbai News : मुंबईत मागील काही वर्षांमध्ये वाढलेली वाहतूक कोंडीची समस्या पाहता अनेकांकडून रेल्वे प्रवासाला पसंती दिली जाते. अशा या शहराच्या बहुतांश भागांना रेल्वेच्या जाळ्यात समाविष्ट करून घेत शहर आणि उपनगरं जोडण्यात आली आहे. याच मुंबई लोकलवर आता शुक्रवार- शनिवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. 

मुंबई - CSMT च्या प्लॅटफॉर्म विस्तारीकरणासाठी मध्य रेल्वेच्या वतीनं दोन दिवस म्हणजेच शुक्रवार- शनिवारदरम्यान रात्रकालीन ब्लॉक घेण्याच येणार आहे. रेल्वेकडून विशेष वाहतूक आणि पॉवर ब्लॉक घेतला जाणार असून,  यादरम्यान शुक्रवारी रात्री लोकलसह मेल-एक्सप्रेसच्या वाहतूकीत काही बदल करण्यात आले आहेत. शनिवारीही लोकल सेवेवर परिणाम दिसणार असून, रात्री 12.30 नंतर भायखळा ते सीएसएमटी आणि वडाळा रोड ते सीएसएमटी दरम्यानची रेल्वेसेवा पहाटे 4.30 वाजेपर्यत बंद राहणार आहे.

पश्चिम रेल्वेवरही हेच चित्र 

मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वेवरही अशीच काहीशी परिस्थिती असेल. चर्चगेट ते मरीन लाईन्सदरम्यान वानखेडे उड्डाणपुलाच्या उत्तरेकडील मुख्य गर्डरच्या कामासाठी शनिवारी मध्यरात्री 1 वाजून 10 मिनिटांपासून पहाटे 4 वाजून 10 मिनिटांपर्यंत तीन तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. ज्यामुळं काही लोकलच्या वेळांवर परिणाम होणार आहे. या ब्लॉक काळाच मुंबई सेंट्रल-चर्चगेट दरम्यान काही लोकल रद्द केल्या जातील.

लांब पल्ल्याच्या रेल्वेगाड्यांमध्ये बदल? 

मध्य रेल्वेवरील ब्लॉकमुळं लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम दिसणार आहेत. या ब्लॉकमुळे गाडी क्रमांक 12502 मडगाव-सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, 22120 मडगाव-सीएसएमटी तेजस एक्स्प्रेस, 11058 अमृतसर-सीएसएमटी एक्स्प्रेस, 11020 भुवनेश्वर-मुंबई कोणार्क एक्स्प्रेस, 12810 हावडा-सीएसएमटी मेल दादर स्थानकांपर्यतच चालविण्यात येतील. तर, सीएसएमटी स्थानकातून कल्याणच्या दिशेनं रात्री 9 वाजून 54 मिनिटांनी सुटणारी लोकल आणि कल्याण स्थानकातून CSMT साठी सुटणारी 11.05 ची लोकल रद्द असेल. 

हेसुद्धा वाचा : HSC SSC Exam Results : निकाल जाहीर होण्यापूर्वी दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी; आता परिक्षा... 

दरम्यान, पश्चिम रेल्वे मार्गावर शनिवारी विरार-चर्चगेट लोकल विरारहून रात्री साडेअकरा वाजता सुटेल आणि चर्चगेटला रात्री 1.10 वाजता पोहोचेल. या प्रवासासाठी धावणारी ही शेवटची लोकल असेल. विरार-चर्चगेट लोकल विरारहून रात्री 11.49 वाजता सुटेल आणि मुंबई सेंट्रलपर्यंत धावेल तर, विरार-चर्चगेट लोकल विरारहून रात्री 12.05 वाजता सुटून मुंबई सेंट्रलपर्यंत धावेल. 

तर, बोरिवली-चर्चगेट लोकल बोरिवलीहून रात्री 12.30 वाजता निघून मुंबई सेंट्रलपर्यंत धावेल. चर्चगेट-विरार लोकल, चर्चगेटहून पहाटे 4.15 वाजता सुटणारी लोकल मुंबई सेंट्रलवरून दहा मिनिटं उशिरानं म्हणजेच पहाटे 4.25 वाजता सुटेल. चर्चगेट-बोरिवली लोकल चर्चगेटहून 10 मिनिटं उशिरानं, अर्थात 4.28 वाजता सुटेल, अशी माहिती पश्चिम रेल्वे प्रशासनानं दिली आहे