21 दिवसात पोहायला शिका, मुंबई महापालिकेचा अनोखा उपक्रम, फी फक्त...

 पोहायला शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुंबईकरांना बीएमसीने यंदाच्या उन्हाळ्यात अशी संधी उपलब्ध करून दिली आहे.

नम्रता पाटील | Updated: Apr 25, 2024, 12:11 PM IST
21 दिवसात पोहायला शिका, मुंबई महापालिकेचा अनोखा उपक्रम, फी फक्त... title=

BMC Swimming Training Classes Details : आरोग्याच्या दृष्टीने पोहणे हा सर्वोत्तम व्यायाम प्रकार मानला जातो. पूर्वी नदी, विहीर, तलाव अशा ठिकाणी अनेक ज्येष्ठ नागरिक पोहण्याचे धडे द्यायचे. पण हल्ली पोहोणाऱ्या व्यक्तींची संख्या कमी होत चालली आहे. त्यातच अनेक जण वेळेअभावी किंवा भीतीपोटी पोहण्याचे प्रशिक्षण घेत नाहीत. पण आता जर तुम्हाला पोहायला शिकायचं असेल तर मुंबई महापालिकेने एक उत्तम संधी उपलब्ध करुन दिली आहे. 

मुंबईतील नागरिकांना क्रीडा आणि व्यायाम प्रकारातील नवी संधी उपलब्ध व्हावी, यासाठी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिकेचे 10 स्विमिंगपूल कार्यरत आहेत. त्यामुळे पोहायला शिकण्याची इच्छा असणाऱ्या मुंबईकरांना बीएमसीने यंदाच्या उन्हाळ्यात अशी संधी उपलब्ध करून दिली आहे. मुंबई महापालिकेच्या 10 जलतरण तलावांवर उन्हाळ्याच्या सुट्टीदरम्यान पोहण्याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

यासाठी 21 दिवसांचे प्रशिक्षण वर्ग सुरु केले जाणार आहेत. येत्या 2 मे 2024 पासून हे 21 दिवसांचे प्रशिक्षण सुरु करण्यात येईल. त्यानंतर या प्रशिक्षणाची दुसरी बॅच 23 मे पासून सुरु होईल. यासाठीची नाव नोंदणी पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. या जलतरण प्रशिक्षणासाठी माफक शुल्क आकारणी केली जाणार आहे. 

प्रशिक्षणासाठी आकारली जाणार इतकी फी

पंधरा वर्षांपर्यंतची मुले, ६० वर्षांपुढील नागरिक, दिव्‍यांग व्‍यक्‍ती यांच्‍यासाठी 2 हजार 100 रुपये, तर 16 ते 60 वयोगटातील नागरिकांसाठी 3 हजार 150 रुपये शुल्क आकारले जाणार आहे. हे प्रशिक्षण दररोज दुपारी 12.30 ते 1.30, दुपारी 2 ते 3 आणि 3.30 ते 4.30 अशा तीन तुकड्यांमध्ये आयोजित केले जाणार आहे. यासाठी मुंबईकरांना https://swimmingpool.mcgm.gov.in/ या वेबसाईटवर जाऊन सर्व माहिती भरावी लागणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी 18001233060 या टोल फ्र‍ि क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन बृहन्‍मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून करण्‍यात येत आहे.

मुंबईतील 'या' जलतरण तलावांवर दिले जाणार प्रशिक्षण

1. महात्मा गांधी स्मारक ऑलिंपिक जलतरण तलाव, दादर (पश्चिम)
2. जनरल अरूणकुमार वैद्य ऑलिंपिक जलतरण तलाव, चेंबूर (पूर्व)
3. सरदार वल्लभभाई पटेल ऑलिंपिक जलतरण तलाव, कांदिवली (पश्चिम)
4. बृहन्मुंबई महानगरपालिका दहिसर (पश्चिम) जलतरण तलाव, कांदरपाडा,दहिसर (पश्चिम)
5. बृहन्मुंबई महानगरपालिका मालाड (पश्चिम) जलतरण तलाव, चाचा नेहरु मैदान,
मालाड (पश्चिम)
6. बृहन्मुंबई महानगरपालिका अंधेरी (पश्चिम) जलतरण तलाव, गिल्‍बर्ट हिल, अंधेरी (पश्चिम)
7. बृहन्मुंबई महानगरपालिका अंधेरी (पूर्व) जलतरण तलाव, कोंडिविटा गाव, अंधेरी (पूर्व)
8. बृहन्मुंबई महानगरपालिका वरळी जलतरण तलाव, वरळी जलाशय टेकडी, वरळी
9. बृहन्मुंबई महानगरपालिका विक्रोळी जलतरण तलाव, टागोर नगर, विक्रोळी (पूर्व)
10. बृहन्मुंबई महानगरपालिका वडाळा जलतरण तलाव, वडाळा अग्निशमन केंद्र, वडाळा