Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना घरं कधी मिळणार? म्हाडानं थेटच सांगितलं...

Mumbai BDD chawl homes : म्हाडानं रहिवाशांपुढं ठेवली एक अट. काय आहे ती अट, नेमकी केव्हा मिळणार मोठी आणि हक्काची घरं? पाहा महत्त्वाची बातमी.   

सायली पाटील | Updated: Apr 26, 2024, 08:17 AM IST
Mumbai News : बीडीडी चाळीतील रहिवाशांना घरं कधी मिळणार? म्हाडानं थेटच सांगितलं... title=
Mumbai news mhada assures Worli bdd chawl residents to give possions of new home within two years

Mumbai BDD chawl homes news : मुंबईत (Mumbai News) सध्या अनेक भागांमध्ये पुनर्विकास प्रकल्प सुरु असून शहराच्या महत्त्वाच्या ठिकाणांचा कायापालट या प्रकल्पांअंतर्गत केला जात आहे. 180 चौरस फुटांच्या घरात राहणाऱ्या शहरातील अनेक कुटुंबांना या पुनर्विकास प्रकल्पांच्या माध्यमातून हक्काची आणि मोठी घरं उपलब्ध करून देण्यात येत आहेत. (Mhada News) म्हाडाच्या मुंबई मंडळाकडून यामध्ये महत्त्वाचं योगदान दिलं जात असून, आता वरळी, नायगाव आणि ना.म. जोशी मार्ग इथं असणाऱ्या बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाच्या कामांनाही चांगलाच वेग आल्याचं पाहायला मिळत आहे. (Mumbai Real Estate)

साधारण मागील दोन वर्षांमध्ये वरील तिन्ही परिसरांमध्ये असणाऱ्या बीडीडी चाळी टप्प्याटप्प्यानं रिकाम्या करत त्यांचं पाडकाम आणि त्यानंतर नव्या घरांसाठी इमारतींचं बांधकाम म्हाडाकडून हाती घेण्यात आलं. ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचं काम सर्वात आधी सुरु झालं खरं, पण कालांतरानं या कामाचा वेग मंगावला आणि वरळी- नायगाव येथील चाळींच्या कामांना वेग मिळाला. दरम्यान ना.म. जोशी मार्ग येथील चाळींच्या कामात होणाऱ्या दिरंगाईमुळं रहिवाशांनी नाराजीचा तीव्र सूर आळवला आणि अखेर म्हाडानं याची दखल घेतली. 

रहिवाशांचं म्हणणं ऐकत त्यावर तोडगा काढण्यासाठी म्हणून नुकतंच म्हाडाच्या मुंबई मंडळातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्थानिक रहिवाशी, अधिकारी आणि वास्तुविशारदांसह संयुक्त बैठक घेतली. रहिवाशांच्या प्रश्नांची उत्तरंदेत सदर परिसरातील बांधकाम वेगानं सुरु असल्याची हमी म्हाडानं दिली. इतकंच नव्हे, तर 2026 च्या एप्रिल महिन्यापर्यंत म्हणजे साधारण दोन वर्षांमध्ये हे बांधकाम पूर्ण होण्याची हमी म्हाडानं दिल्याची माहिती ना.म. जोशी मार्ग बीडीडी पुनर्विकास समिती अध्यक्ष कृष्णकांत नलगे यांनी माध्यमांना दिली. 

हेसुद्धा वाचा : Video Viral : बॉसच्या जाचाला कंटाळून नोकरी सोडणाऱ्या तरुणाकडून शेवटच्या दिवशी ढोलताशे वाजवत कंपनीला निरोप

म्हाडाच्या या पुनर्विकास प्रकल्पासाठी ना.म. जोशी मार्ग येथील बीडीडी चाळीतून 2560 रहिवासी पात्र असून, त्यातील 1260 रहिवाशांना पहिल्या टप्प्यात घरं उपलब्ध करून दिली जाणार आहेत. 2026 च्या एप्रिल महिन्यापर्यंत त्यांना नव्या घराचा ताबा मिळेल हे आता जवळपास निश्चित झालं आहे. 

म्हाडाची अट... 

पहिल्या टप्प्यातील घरं कधी मिळणार या प्रश्नाचं उत्तर देत असतानाच म्हाडाकडून दुसऱ्या टप्प्याच्या कामालाही लवकरच सुरुवात होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. दरम्यान, दुसऱ्या टप्प्यातील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिरांच्या अनुपलब्धतेमुळं रहिवाशांनी घरभाड्याच्या पर्यायाचा विचार करत घरं रिकामी केल्यास बांधकामाला वेग मिळेल असंही म्हाडा अधिकाऱ्यांकडून रहिवाशांना सांगण्यात आलं आहे. तेव्हा आता रहिवाशांकडून नेमका कोणता पर्याय निवडला जातो हे पाहणं महत्त्वाचं असेल.