राकेश झुनझुनवालांच्या पत्नीने एका दिवसात गमावले तब्बल 800,00,00,000 रुपये; आवडत्या शेअरनेच केलं नुकसान

शेअर बाजारातील (Share Market) बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांना तब्बल 800 कोटींचं नुकसान सहन करावं लागलं आहे. नेमकं काय झालं ते समजून घ्या...   

शिवराज यादव | Updated: May 7, 2024, 06:12 PM IST
राकेश झुनझुनवालांच्या पत्नीने एका दिवसात गमावले तब्बल 800,00,00,000 रुपये; आवडत्या शेअरनेच केलं नुकसान title=
(Photo: Forbes)

शेअर बाजारातील (Share Market) बिग बुल म्हणून ओळखले जाणारे दिवंगत गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला (Rakesh Jhunjhunwala) यांच्या पत्नी रेखा झुनझुनवाला (Rekha Jhunjhunwala) यांना सोमवारी तब्बल 800 कोटींचं नुकसान सहन करावं लागलं आहे. टायटन कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाल्याने रेखा झुनझुनवाला यांना इतका मोठा तोटा झाला आहे. टाटा ग्रुपची कंपनी असणारी टायटन ही झुनझुनवाला यांची सर्वात आवडती कंपनी आहे. या कंपनीत त्यांची सर्वाधिक गुंतवणूक आहे. शुक्रवारी शेअर मार्केट बंद झालं तेव्हा 16 हजार 792 कोटी होती. ट्रेंडलाइन डॉट.कॉमच्या वृत्तानुसार, 31 मार्च 2024 पर्यंत टायटन कंपनीत रेखा झुनझुनवाला यांची 5.35 टक्क्यांची भागीदारी आहे. 

टायटनचे शेअर्स 7% पेक्षा जास्त घसरल्याने सोमवारी रेखा झुनझुनवाला यांचं मोठं नुकसान झालं. टायटनचे शेअर्स मार्च महिन्याच्या तिमाहीत अनेक गुंतवणूकदारांना दिलासा देण्यात अपयशी ठरले होते. यामुळेच शेअर्स 7 टक्क्यांपेक्षा अधिक खाली घसरत बंद झाले. 

शेअर्सने दिवसभरात 3,352.25 चा नीचांक गाठला आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये 3,281.65 वर बंद झाला. परिणामी, कंपनीचे निव्वळ मूल्य₹3 लाख कोटींपेक्षा कमी झालं आणि खाली घसरून 2,91,340.35 कोटी इतके झाले. सोमवारी एकूण 22 हजार कोटी कंपनीच्या मार्केट कॅपमधून नष्ट झाले.

हिंदुस्तान टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, शेअर्समध्ये झालेल्या घसरणीमुळे रेखा झुनझुनवाला यांची टायटनमधील भागीदारी जवळपास 15,986 कोटी इतकी कमी झाली.

दरम्यान आपल्या ताज्या कमाईच्या अहवालात, कंपनीने मार्च तिमाहीत करानंतरचा एकत्रित नफा (PAT) 5% वाढून 771 कोटीवर पोहोचल्याचं सांगितलं आहे. जो मागील वर्षीच्या कालावधीत 736 कोटी होता.

टायटनची तिमाहीतील कमाई

टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टायटनने मार्चच्या तिमाहीतील निकालात उत्पन्नात 21 टक्के वाढ झाल्याची माहिती दिली आहे. टायटनचे एकूण उत्पन्न मागील आर्थिक वर्षातील याच कालावधीतील 9,419 कोटींवरून चौथ्या तिमाहीत 11,472 कोटी इतके वाढले. कंपनीने मागील आर्थिक वर्षात 3,496 कोटींचा एकत्रित PAT पोस्ट केला होता, ज्याच्या तुलनेत FY23 मध्ये 3,274 कोटी होता. FY24 साठी कंपनीचे एकूण उत्पन्न 2022-23 आर्थिक वर्षातील 38,675 कोटींच्या तुलनेत 47,501 कोटी होते.

"70-100 bps ज्वेलरी मार्जिन चुकल्यामुळे आणि निधी नुकसानीमुळे टायटनचा Q4 PAT अंदाज 10-12 टक्क्यांनी चुकला," असं एमके रिसर्चच्या अहवालात म्हटले आहे.