ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर संकट; 2 दिवस 'या' भागात 100 टक्के पाणीकपात

Mumbai News Today: ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांना पाणीकपातीचा सामना करावा लागणार आहे. दोन दिवस पाणी कपातीचा इशारा देण्यात आला आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 18, 2024, 07:00 AM IST
ऐन उन्हाळ्यात मुंबईकरांवर संकट; 2 दिवस 'या' भागात 100 टक्के पाणीकपात title=
Residents of Bandra, Dharavi and Mahim will face a cut in water supply on April 18-19

Mumbai News Today: उन्हाचा तडाखा वाढला आहे. हवामान विभागाने पाच दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. कमाल तापमानात वाढ झाल्यामुळं धरणातील पाणीसाठाही कमी झाला आहे. त्यामुळं मुंबईकरांवर पाणीकपातीची टांगती तलवार असतानाच गुरवारी आणि शुक्रवारी मुंबईतील काही भागात पाणीपुरवठा होणार नाहीये. तर, काही भागांत 25 टक्के पाणीकपात होणार आहे. त्यामुळं नागरिकांनी पाण्याचा अपव्यय टाळावा आणि पाणी जपून वापरावे, असं आवाहन करण्यात येत आहे. 

अप्पर वैतरणेची मुख्य पाइपलाइन असलेल्या धारावीतील नवरंग कपाऊंड येथे असलेल्या 2400 मिली व्यासाच्या पाइपलाइनच्या दुरुस्तीचे आणि जोडणीचे काम दोन दिवस हाती घेण्यात आले आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी हे काम करण्यात येणार असल्याचे बीएमसीकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळं मुंबईतील वांद्रेपूर्व भागात पूर्णपणे पाणीपुरवठा बंद राहणार आहे. तर, धारावीच्या काही भागात 25 टक्के पाणीकपात होणार आहे. 

गुरुवारी सकाळी 10 ते शुक्रवारी पहाटे 4 वाजेपर्यंत म्हणजेच सुमारे 18 तास पाइपलाइन जोडणीचे काम सुरू राहणार आहे. त्यामुळं हे दोन दिवस नागरिकांना पाणी कपातीचा सामना करावा लागणार आहे. 

100 टक्के पाणीकपात कुठे?

गुरुवार 18 एप्रिल 2024 आणि शुक्रवार 19 एप्रिल रोजी वांद्रे पूर्वेकडील वांद्रे रेल्वे टर्मिनन्स, वांद्रे स्थानक परिसरात पाणी नसेल. तर, धारावीत 18 एप्रिल रोजी जी नॉर्थ, वॉर्डातर्गंत धारावी लूप रोड, नाईक नगर, प्रेम नगर या भागात सकाळी पाणीपुरवठा नसेल. तसंच, 18 एप्रिल रोजी धारावीतील गणेश मंदिर मार्ग, दिलीप कदम मार्ग, माहिम फाटक मार्ग या परिसरात संध्याकाळी पाणीपुरवठा होणार नाहीये. 

या भागात 25 टक्के पाणीकपात 

धारावीच्या 60 फूट रोड, सायन-माहिम लिंक रोड, 90 फूट रोड, महात्मा गांधी मार्ग, संत कक्कय्या मार्ग, AKG नगर आणि एमपी नगरमध्ये गुरुवारी 15 एप्रिल रोजी सकाळी 25 टक्के पाणीकपात होणार आहे. त्यामुळं नागरिकांनी जपून पाणी वापरावे, असं अवाहन करण्यात आले आहे.