'किंगफिशर एअरलाइन्स'ला दिलासा

इंधनाचा पुरवठा होऊ न शकल्याने किंगफिशर एअरलाइन्सची बुधवारी रात्रीची तीन उड्डाणे रद्द करण्यात आली. एका उड्डाणाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. दरम्यान, इंधन पुरवठा आज सकाळी सुरळीत झाल्यानंतर किंगफिशर एअरलाइन्सला दिलासा मिळाला.

Updated: Mar 8, 2012, 07:57 PM IST

www.24taas.com, चेन्नई 

 

इंधनाचा पुरवठा होऊ न शकल्याने किंगफिशर एअरलाइन्सची  बुधवारी रात्रीची तीन उड्डाणे रद्द करण्यात आली. एका उड्डाणाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. दरम्यान, इंधन पुरवठा आज सकाळी सुरळीत झाल्यानंतर किंगफिशर एअरलाइन्सला दिलासा मिळाला.

 

 

चेन्नई-कोलंबो, चेन्नई-कोईम्बतूर आणि चेन्नई-विझाग ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत. चेन्नई-कोलंबो उड्डाण रद्द करण्यात आल्यावर ६८ प्रवाशांना जेट एअरवेज आणि लंकन एअरवेज यांमध्ये जागा देण्यात आली. चेन्नई-मदुराई उड्डाणाच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. मात्र. इंधन पुरवठा सुरळीत झाल्याने आता विमान उड्डाने होऊ शकणार आहेत. इंधन न देण्याचा निर्णय कंपन्यानी घेतल्याने किंगफिशर एअरलाइन्स अडचणीत सापडली होती.

 

 

किंगफिशर एअरलाइन्सला एचपीसीएलकडून दिलासा मिळालाय. एचपीसीएलनं किंगफिशर एअरलाईन्सला इंधनाचा पुरवठा पुन्हा सुरू केलाय. आर्थिक संकटात सापडलेल्या किंगफिशरनं रोजच्या रोज इंधनाचे पैसे द्यायला होकार दिल्यानं एचपीसीएलनं हा निर्णय घेतलाय. एचपीसीएलनं किंगफिशर एअरलाईन्सचा इंधन पुरवठा काल बंद केला होता. त्यानंतर किंगफिशर एअरलाईन्स आणि एचपीसीएलच्या अधिका-यांमध्ये बराच वेळ चर्चा झाली. चर्चेनंतर अखेर तोडगा काढण्यात दोन्ही बाजूंना यश आलं. किंगफिशरकडून पैशाची पूर्तता होत नसल्यानं इंधनाचा पुरवठा बंद करण्यात आला होता, असं एचपीसीएलनं स्पष्ट केलं. तर एचपीसीएलची किंगफिशर कंपनीकडे पाचशे कोटींची रक्कम अजूनही थकीत आहे.

 

 

दरम्यान,  किंगफिशर एअरलाइन्स ही विमानकंपनी बंद करण्यात येईल अशी धमकी कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय अगरवाल यांनी वैमानिकांना नुकतीच दिली होती. वेतन न मिळाल्यास वैमानिक विमाने नेणार नाहीत असे वैमानिकांतर्फे व्यवस्थापनाला सांगण्यात आले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून ही धमकी दिली होती.  ही विमान कंपनी सुरू झाल्यापासून प्रथमच अशा प्रकारची धमकी कर्मचाऱ्यांना व्यवस्थापनाकडून दिली गेल्यामुळे आश्‍चर्य व्यक्त होत आहे.

 

 

 

आधीच आर्थिक समस्यांनी ग्रस्त असलेल्या किंगफिशर एअरलाइन्सने वैमानिकांचे वेतन अनियमित दिल्यामुळे मुंबईतील कंपनीच्या वैमानिकांनी शनिवारी  आजारपणाची सामूहिक रजा घेऊन कामावर येणे टाळले. परंतु यामुळे आधीच कमी केलेल्या उड्डाणांमध्ये कोणतीही बाधा आली नाही.  किंगफिशर एअरलाइन्सची चिंता सेवाकर विभागाने आणखी वाढवली आहे. या विभागाने गेल्या चार महिन्यांत चौथ्यांदा कंपनीची बॅंक खाती गोठवली होती. कंपनीने ४० कोटी रुपये सेवाकर भरायचा आहे. मात्र सेवाकर भरण्याची २९ फेब्रुवारी ही तारीख  उलटूनही कंपनीने सेवाकर अद्याप भरलेला नव्हता. त्यामुळे कंपनीबाबत तर्कवितर्क लढविण्यात येत होते.