Mumbai Indians: 12 वर्षानंतरही मुंबईची टीम जैसे थे...; सवाई मानसिंह स्टेडियममध्ये पुन्हा तेच घडलं

Rajasthan Royals vs Mumbai Indians: या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण टीमची सुरुवात खूपच खराब झाली. मुंबईने पहिल्या 4 विकेट्स अवघ्या 52 रन्समध्ये गमावल्या. 

सुरभि जगदीश | Updated: Apr 23, 2024, 08:45 AM IST
Mumbai Indians: 12 वर्षानंतरही मुंबईची टीम जैसे थे...; सवाई मानसिंह स्टेडियममध्ये पुन्हा तेच घडलं title=

Rajasthan Royals vs Mumbai Indians: यंदाच्या आयपीएलमध्ये 38 वा सामना मुंबई इंडियन्स विरूद्ध राजस्थान रॉयल्स यांच्यामध्ये खेळला गेला. जयपूरच्या सवाई मनासिंह स्टेडियममध्ये रंगलेल्या या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 9  विकेट्सने विजय मिळवला. या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या टीमने उत्तम चमकदार कामगिरी केली. यंदाच्या सिझनमधील राजस्थानचा हा 7 वा विजय होता. या विजयासह राजस्थान रॉयल्सची टीम प्लेऑफ गाठण्याच्या उंबरठ्यावर आहे. दुसरीकडे मुंबईचा या सिझनमधील 5 वा पराभव झाला.

मुंबई इंडियन्सचा प्रथम फलंदाजीचा निर्णय 

या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण टीमची सुरुवात खूपच खराब झाली. मुंबईने पहिल्या 4 विकेट्स अवघ्या 52 रन्समध्ये गमावल्या. यानंतर तिलक वर्मा आणि नेहल वढेरा यांनी टीमचा डाव सांभाळत 179 रन्सपर्यंत मजल मारली. या डावात तिलक वर्माने मुंबई टीमकडून सर्वाधिक 65 रन्स केले. तर नेहल वढेराने 49 धावांचे योगदान दिले. दुसरीकडे राजस्थानकडून संदीप शर्माने सर्वाधिक 5 विकेट्स घेतले. 

राजस्थानचा मुंबई इंडियन्सवर सहज विजय

मुंबई इंडियन्सने राजस्थान रॉयल्सला 180 रन्सचं लक्ष्य दिलं होतं. पण हे लक्ष्य राजस्थानच्या फलंदाजांनी सहज गाठलं. संजू सॅमसनच्या टीमने केवळ 1 विकेट गमावून लक्ष्य गाठलं. या सामन्यात यशस्वी जयस्वालच्या शानदार शतकी खेळी केली. यशस्वी जयस्वालने नाबाद 104 रन्स केले. तर संजू सॅमसनने 28 बॉल्समध्ये 38 रन्स करून नाबाद राहिला. 

12 वर्षानंतरही मुंबईच्या टीमची हालत बदलेना

2012 पासून मुंबई इंडियन्स टीमने जयपूरमध्ये राजस्थान रॉयल्सचा पराभव केलेला नाही. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली टीमला हा नकोसा रेकॉर्ड तोडण्यात अपयश आलं. जयपूरमध्ये राजस्थान आणि मुंबई यांच्यात आतापर्यंत 8 सामने झाले असून त्यापैकी 6 सामने राजस्थानने जिंकले आहेत. शेवटच्या वेळी 2012 मध्ये मुंबईने राजस्थानला त्याच्या होम ग्राउंड जयपूरमध्ये पराभूत केलं होतं. त्यानंतर मुंबईला विजय मिळवणं शक्य झालं नाही.