मुंबई इंडियन्सची Playoff ची दारं बंद? सहाव्या पराभवानंतर Qualify होणं शक्य?

MI Playoff Qualifying Scenario: मुंबई इंडियन्सच्या संघाला शनिवारी झालेल्या सामन्यामध्ये दिल्लीच्या संघाने 10 धावांनी पराभूत केलं. हा मुंबईचा यंदाच्या स्पर्धेतील 6 वा पराभव ठरला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 28, 2024, 09:42 AM IST
मुंबई इंडियन्सची Playoff ची दारं बंद? सहाव्या पराभवानंतर Qualify होणं शक्य? title=
मुंबई इंडियन्सच्या संघाचा सहावा पराभव

MI Playoff Qualifying Scenario: रविवारी नवी दिल्लीमधील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या इंडियन प्रिमिअर लीगच्या सामन्यामध्ये मुंबईचा 10 धावांना पराभव झाला. हा स्पर्धेमधील मुंबईचा सहावा पराभव ठरला आहे. आपल्या नऊ सामन्यांपैकी 6 सामने गमावलेला हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील मुंबईचा संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरु शकेल की नाही यासंदर्भातील चिंता आता मुंबईच्या चाहत्यांना सतावत आहे. जाणून घेऊयात याचसंदर्भातील आकडेमोड काय सांगते याबद्दल...

मुंबईच्या नावावर किती गुण?

मुंबई आणि दिल्लीदरम्यान झालेल्या सामन्यात दिल्लीच्या संघाने मुंबईच्या गोलंदाजांची मनसोक्त धुलाई करत 20 ओव्हरमध्ये तब्बल 257 धावा कुटल्या. 258 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाला केवळ 247 धावांपर्यंतच मजल मारता आली. मुंबईचा संघ 10 धावांनी पराभूत झाला. मुंबईच्या या पराभावसहीत दिल्लीच्या संघाने 10 पैकी 5 सामने जिंकत पाचवे स्थान पटकावले आहे. तर दुसरीकडे मुंबईची आठव्या स्थानावरुन नवव्या स्थानी घसरण झाली आहे. मुंबईच्या संघाने केवळ 3 सामने जिंकले आहेत. मुंबईच्या नावावर 6 पॉइण्ट्स असून त्यांचं नेट रन रेट उणे 0.261 इतकं आहे. 

मुंबईला पात्र ठरायचं असेल तर...

आता संघाचे केवळ 5 सामने शिकल्लक राहिलेले असताना मुंबईचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल का असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. तर या प्रश्नाचं उत्तर हो असं आहे. मुंबईचा संघ अजूनही प्लेऑफसाठी पात्र ठरु शकेल. मात्र आता पात्रतेचं हे गणित साध सरळ नसणार तर त्यासाठी अनेक अटी आणि शर्थी लागू असतील. या अटी तसेच शर्थी कोणत्या हे पाहूयात...

> प्लेऑफसाठी पात्र ठरायचं असेल तर मुंबईच्या संघाला सर्वात आधी त्यांचे उरलेले सर्व पाचही सामने जिंकावे लागतील. बरं केवळ विजय मिळवून पुरेसं ठरणार नाही तर मोठ्या फरकाने मुंबईला हे विजय मिळवावे लागतील. 

> मुंबईच्या संघाने हे 5 सामने जिंकले तर त्यांचे एकूण विजयी सामने 8 होतील आणि पॉइण्ट्स टेबलमध्ये त्यांचे पॉइण्ट्स 16 होतील. असं झालं तर मुंबई प्लेऑफसाठी पात्र ठरण्याची शक्यता अधिक वाढेल.

> बरं मुंबईची सध्याची कामगिरी पाहता ते पाचही सामने मोठ्या फरकाने जिंकण्याची शक्यता तशी कमीच आहे. त्यामुळेच एखाद्या सामन्यात पराभव झाला तरी मुंबईला इतर संघाच्या कामगिरीवर अवलंबून रहावं लागणार आहे. 

> केवळ मुंबई इंडियन्सचं नाही तर सध्या शिखर धवनच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या पंजाब किंग्ज इलेव्हनच्या संघाचीही अशीच स्थिती आहे. मात्र पंजाबसाठी एकमेव जमेची बाजू म्हणजे त्यांचा नेट रनरेट हा मुंबईपेक्षाही उजवा आहे. पंजाबचा नेट रनरेट उणे 0.187 इतका आहे. 

> अनेक संघांचे पॉइण्ट्स 14 असतील आणि पॉइण्ट्सच्याबाबतीत संघांमध्ये टाय झाल्यास नेट रनरेटच्या जोरावर चौथ्या स्थानावरील संघ निश्चित केला जाईल. त्यामुळे मोठ्या फरकाने सामने जिंकून जास्तीत जास्त सूत्र आपल्या हाती ठेवण्याचाच मुंबईचा प्रयत्न असेल.