'स्पेशल चप्पल तुझी वाट पाहतेय' रेकॉर्डब्रेक खेळीनंतरही युवराज सिंग अभिषेक शर्मावर संतापला?

IPL 2024 : आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या अभिषेक शर्माने विक्रम रचला. आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतक करण्याचा विक्रम त्याच्या नावावर जमा झालाय. पण यानंतरही टीम इंडियाचा माजी ऑलराऊंडर युवराज सिंग अभिषेकवर चांगलाच संतापला आहे. 

राजीव कासले | Updated: Mar 28, 2024, 08:19 PM IST
'स्पेशल चप्पल तुझी वाट पाहतेय' रेकॉर्डब्रेक खेळीनंतरही युवराज सिंग अभिषेक शर्मावर संतापला? title=

IPL 2024: आयपीएलचा आठव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या (Sunrisers Hyderabad) अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) ऐतिहासिक कामगिरी केली. अभिषेकने आयपीएलमध्ये वेगवान अर्धशतक ठोकलं. अवघ्या 16 चेंडूत अभिषेकने अर्धशतक केलं. आयपीएलच्या इतिहासातील हे सर्वात वेगवान अर्धशतक ठरलं आहे. अभिषेकने आपल्या खेळीत 23 चेंडूत 274 च्या स्ट्राईक रेटने 63 धावा केल्या. आपल्या खेळीत अभिषेकने तब्बल 7 षटकार आणि 3 चौकार लगावले. अभिषेकने मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली. अभिषेकच्या या खेळीचं चांगलंच कौतुक होतंय. पण टीम इंडियाचा माजी स्टार ऑलराऊंडर युवराज सिंग मात्र अभिषेकवर चांगलाच संतापलाय.

युवराज सिंग अभिषेकवर संतापला
युवराज सिंगने (Yuvraj Singh) एक्स अकाऊंटवर अभिषेकसाठी एक पोस्ट शेअर केली आहे. यात त्याने अभिषेकचं कौतुकही केलंय आणि त्याला फटकारलं देखील आहे. युवराजने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय, 'वाह! सर अभिषेक वाह, खूप चांगला खेळलाक, पण काय जबरदस्त फटका मारून आऊट झालास. लातों के भूत बातों से नहीं मानते, स्पेशल चप्पल अभिषेकची वाट पाहतेय, हेन्रिक क्लासेननेही सुंदर खेळी केली' 

चांगला फॉर्मात असताना अभिषेक शर्मा मिड विकेटवर सोपा झेल देऊन बाद झाला. यावरुन युवराज सिंगने अभिषेकला फटकारलं आहे.

युवराज-अभिषेकचं नातं
वास्तविक युवराज सिंग आणि अभिषेक शर्मा दोघंही पंजाबचे खेळाडू आहेत. अभिषेक शर्माच्या क्रिकेट कारकिर्दीत युवराज सिंगचं मोलाचं योगदान आहे. युवराजने वेळोवेळी त्याला मार्गदर्शन केलंय. सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी 2023-2024 स्पर्धेत अभिषेकने तब्बल 485 धावा केल्या होत्या. पंजाबला ट्रॉफी जिंकून देण्यात अभिषेकने महत्त्वाची भूमिका बजावली होती. या स्पर्धेतील दमदार कामगिरीचं श्रेय अभिषेकने युवराज सिंगला दिलं होतं. 

कोण आहे अभिषेक शर्मा?
अभिषेक शर्माचा जन्म 4 सप्टेंबर 2000 मध्ये पंजाबच्या अमृतसरमध्ये झाला. अभिषेक पंजाब संघाकडून स्थानिक क्रिकेट खेळतो. अभिषेकच्या वडिलांचं नाव राजकुमार शर्मा आहे. ते त्याचे क्रिकेट प्रशिक्षकही आहेत. राजकुमार शर्माही पंजाबसाठी स्थानिक क्रिकेट खेळलेत. अभिषेकने वयाच्या अवघ्या 16 व्या वर्षात रणजी ट्ऱॉफीत पदार्पण केलं. रणजी ट्रॉफीत पहिल्याच सामन्यात हिमाचल प्रदेशविरुद्ध अभिषेकने 94 धावांची खेळी केली. शिवाय एक विकेटही घेतली. हा सामना ड्रॉ झाला. पण अभिषेकच्या खेळीचं कौतुक झालं. 

त्यानंतर अभिषेकने मागे वळून पाहिलं नाही. टीम इंडियाच्या अंडर-19 संघाच्या कर्णधारपदी त्याची नियुक्ती करण्यात आली. अभिषेकच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने इमर्जिंग एशिया कपवर नाव कोरलं. 2015-16 मध्ये अभिषेकने विजय मर्चंट ट्रॉफीत तब्बल 1200 धावा केल्या आणि 57 विकेट घेतल्या. बीसीसीआयचा राज सिंह डुंगरपूर अवॉर्ड जिंकणारा अभिषेक पहिला क्रिकेटपटू बनला. 

2018 मध्ये अभिषेकने आयपीएलमध्ये पदार्पण केलं. दिल्ली डेअरडेव्हिल्सने 55 लाखांत आपल्या संघात घेतलं. अभिषेकने आपल्या पहिल्याच सामन्यात 46 धावा केल्या. 2019 मध्ये सनरायजर्स हैदराबादने अभिषेकवर बोली लावत आपल्या संघात घेतलं. 2022 च्या आयपीएल ऑक्शनमध्ये हैदराबादनेत त्याच्यावर तब्बल 6 कोटींची बोली लावली. अभिषेक आयपीएलमध्ये आतापर्यंत 49 सामने खेळला असून यात त्याने 988 धावा केल्यात.