एका बॉलमध्ये दिले 15 रन.. IPL मधील आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये 'त्याचा' अभूतपूर्व गोंधळ

This Bowler Gives 15 Runs In 1 Ball: आयपीएलमध्ये पहिल्यांदाच खेळणाऱ्या या खेळाडूला पहिलीच ओव्हर टाकण्याची संधी मिळाली. त्याने या आपल्या आयपीएलमधील पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या 5 चेंडूंमध्ये 7 धावा दिल्या. मात्र नंतर ओव्हर संपली तेव्हा या ओव्हरमध्ये एकूण 22 धावा झाल्या होत्या.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 18, 2024, 05:04 PM IST
एका बॉलमध्ये दिले 15 रन.. IPL मधील आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये 'त्याचा' अभूतपूर्व गोंधळ title=
पहिल्याच ओव्हरमध्ये दिल्या एवढ्या रन

This Bowler Gives 15 Runs In 1 Ball: इंडियन प्रिमिअर लीगच्या 28 व्या सामन्यामध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या संघाने लखनऊ सुपर जायंट्सच्या संघावर आठ विकेट्सने मोठा विजय मिळवला. या सामन्यामधील लखनऊच्या सुमार कामगिरीमध्येही एका नवख्या गोलंदाजाची कामगिरी चांगलीच चर्चेत राहिली. या गोलंदाजाने आयपीएलमधील पहिलाच सामना खेळताना 4 ओव्हरमध्ये तब्बल 47 धावा दिल्या. विशेष म्हणजे आयपीएलमधील आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये या गोलंदाजाने 22 धावा दिल्या. ही सामन्यातील पहिलीच ओव्हर होती आणि गोलंदाजी करणारा हा तरुण गोलंदाज होता शामर जोसेफ! शामर हा वेस्ट इंडिजचा तरुण वेगवान गोलंदाज आहे. 

शेवटच्या बॉलवर गोंधळ

इडन गार्डन्समध्ये झालेल्या या सामन्यामध्ये पहिल्यांदाच आयपीएल खेळणाऱ्या शामरला गोंधळलेला पाहून केकेआरच्या फलंदाजांनी चांगलाच फायदा घेतला. आधीच खेळपट्टी गोलंदाजांना विशेष काही साथ देत नव्हती. त्यातच आपल्या पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर शामरने तब्बल 15 धावा दिल्या. हा शेवटचा बॉल टाकताना शामरने 2 नो बॉल, 2 वाईड बॉल टाकले. अखेर फिलिप सॉल्टने या अधिकृत बॉलवर लाँग ऑफला जोरदार षटकार लगावला.

एकूण 15 रन कसे दिले?

शामरने आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये पहिल्या 5 चेंडूंमध्ये 7 धावा दिल्या. शेवटच्या चेंडूवर यश ठाकूरने एक सोपा झेल सोडला. मात्र नंतर हा नो बॉल असल्याचं स्पष्ट झाल्याने या सुटलेल्या कॅचला फारसा अर्थ राहिला नाही. त्यानंतर शामरने ऑफ स्टमप बाहेर गोलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचा पहिला प्रयत्न वाईड बॉल ठरला. त्यानंतर दुसऱ्या प्रयत्नात तर शामरने चेंडू एवढ्या बाहेर टाकला की तो कोणाच्याही हाती न लागला थेट सीमारेषेपार गेला. त्यानंतर पुढल्या प्रयत्नात शामरने टाकलेला चेंडू नो बॉल ठरला. अखेर जेव्हा शामरने योग्य चेंडू टाकला तेव्हा त्यावर षटकार लगावण्यात आला. म्हणजजेच पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या बॉलसाठी शामरने तब्बल 15 रन दिले.

नक्की वाचा >> 'मला हेच कळत नाही की..'; IPL मध्ये High Scoring सामने होऊ नयेत म्हणून गंभीरचा अजब सल्ला

पराभवनानंतर कर्णधाराही त्याच्याबद्दल बोलला

या सामन्यामध्ये पराभूत झाल्यानंतर लखनऊचा कर्णधार के. एल. राहुलने शामरच्या गोलंदाजीसंदर्भात भाष्य केलं. "एखाद्या दिवशी अशी फटकेबाजी होते. अशा सामन्यांमधील कामगिरी पचवणं आपल्यालाच कठीण जातं. आपण हे असं यापूर्वीही आयपीएलमध्ये पाहिलं आहे. प्रत्येक संघाबरोबर असं घडलं आहे. आम्ही नेमकं आमचं काय चुकलं यावर काम करुन आणि अधिक उत्तम पद्धतीने पुढील सामन्यासाठी तयार होऊ. दुसऱ्या डावामध्ये चेंडू हातातून सुटत होता. पहिल्या डावात खेळलेले फटके योग्य पद्धतीने बसत नव्हते. त्यामुळेच आम्ही वेळोवेळी विकेट्स गमावल्या. आम्ही अधिक धाव्या केल्या असत्या. मात्र आम्हाला ते जमलं नाही आणि आम्ही सामना गमावला," असं राहुल म्हणाला.

"शामर फार वेगाने गोलंदाजी करतो. तो फारच उत्साहात होता. त्याला वेगाने गोलंदाजी करायची होती. मात्र थोडं लक्ष विचलित झाल्यानंतर तुम्ही तुमचा पहिला आयपीएल सामना खेळत असता असं होऊ शकतं. त्याला योग्य टप्प्यावर आणि योग्य लेंथवर गोलंदाजी करण्याचा सराव करायला हवा. अर्थात पॉवर प्लेदरम्यान त्याने बॉल स्वींग करणंही जमायला हवं. त्याने घाबरुन जाता कामा नये. आम्ही कुठे चुकलो हे शोधायला हवं. मागील काही सामन्यांमध्ये आम्हाला 160 चा टप्पा ओलांडता आलेला नाही. इथे आम्ही सुधारणा करण्याची गरज आहे," असं राहुल म्हणाला.