...अन् धोनीने ड्रेसिंग रुममध्येच हेल्मेट फेकून दिलं; CSK च्या माजी खेळाडूने सांगितली ती घटना, 'मी त्याला...'

2014 मध्ये क्वालिफायर 2 सामन्यात पंजाबने चेन्नईचा पराभव केल्यानंतर महेंद्रसिंग धोनी प्रचंड संतापला होता. या रागात त्याने हेल्मेट आणि पॅड फेकून दिले होते.   

शिवराज यादव | Updated: Apr 21, 2024, 04:46 PM IST
...अन् धोनीने ड्रेसिंग रुममध्येच हेल्मेट फेकून दिलं; CSK च्या माजी खेळाडूने सांगितली ती घटना, 'मी त्याला...' title=

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीला कॅप्टन कूल म्हणून ओळखलं जातं. महेंद्रसिंग धोनीला अत्यंत संयमीपणे कोणतीही स्थिती हाताळण्यासाठी ओळखलं जातं. मैदानात संघावर कितीही दबाव असला तरी धोनी कधीही चेहऱ्यावरची रेष हलू देत नाही. आधी भारतीय संघ आणि नंतर चेन्नईचं नेतृत्व करताना त्याने आपल्या या संयमीपणामुळे 'कॅप्टन कूल' उपाधी मिळवली होती. पण काही क्षण असे होते जेव्हा धोनीही प्रचंड संतापला होता. चेन्नईच्या ड्रेसिंग रुममध्ये संघातील सहकाऱ्यांना हे दुर्मिळ क्षण दिसले होते. चेन्नईचा माजी खेळाडू सुरेश रैना याने अशाच एका घटनेचा खुलासा केला आहे. 

लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत सुरेश रैनाने आयपीएल 2014 मधील ती आठववण ताजी केली. यावेळी क्वालिफायर 2 सामन्यात पंजाबने चेन्नईचा पराभव केला होता. विरेंद्र सेहवागने पंजाबकडून खेळताना 58 चेंडूत 122 धावा ठोकल्या होत्या. पंजाबने चेन्नईसमोर 226 धावांचा डोंगर उभा केला होता. सुरेश रैनाने या सामन्यात 25 चेंडूत 87 धावा ठोकत कडवं आव्हान दिलं होतं. धोनीनेही 31 चेंडूत 42 धावा केल्या होत्या.  पण 24 धावांनी चेन्नईचा पराभव झाला होता. 

या पराभवानंतर कर्णधार महेंद्रसिंग धोनी प्रचंड संतापला होता. त्याने ड्रेसिंग रुममध्ये आल्यानंतर हेल्मेट आणि पॅड फेकून दिलं होतं. चेन्नईचे फलंदाज जास्त धावा न करु शकल्याचा संताप त्याने व्यक्त केला होता. 

"मी धोनीला इतकं रागावलेलं कधीच पाहिलं नव्हतं. त्या सामन्यानंतर त्याने सगळा संताप व्यक्त केला. आपण धावा करत नाही, हे करत नाही वैगेरे तो म्हणत होता. त्याने ड्रेसिंग रुममध्ये आपलं हेल्मेट आणि पॅड फेकून दिलं. आपण जिंकायला हवा होता असा सामना गमावल्याने तो चिडला होता. त्याच्या मते आपण हा सामना काही करुन जिंकायला हवा होता. अन्यथा कदाचित आम्ही त्यावर्षीचा आयपीएलही जिंकला असता," असं सुरेश रैनाने सांगितलं. 

सुरेश रैनाने यावेळी पंजाबविरोधात केलेल्या आपल्या 87 धावांच्या तुफानी खेळीवरही भाष्य केलं. सुरेश रैनाने एकूण 6 षटकार आणि 12 चौकार लागवले होते. "मला जणू काही झपाटलं होतं. मला आदल्या दिवशी, मी काहीतरी विशेष करेन असं स्वप्न पडलं होतं. मला चेंडू फुटबॉलसारखा दिसत होता. पण, मी धावबाद झालो. बॅटला लागलेला चेंडू मला खूप वेगळा आवाज देत होता. मला असं वाटत होते की कोणीही मला रोखू शकत नाही,” असं रैनाने सांगितलं.