'दिनेश कार्तिकला T-20 वर्ल्डकप संघात घेण्यात काही अर्थ नाही,' युवराजने स्पष्टच सांगितलं, 'त्याला जर तुम्ही...'

Yuvraj Singh on Dinesh Karthik: युवराज सिंगने (Yuvraj Singh) दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) आयपीएलमधील कामगिरीचं कौतुक केलं आहे. मात्र जर त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळणार नसेल तर टी-20 वर्ल्डकप संघात घेण्यात अर्थ नाही असं स्पष्ट म्हटलं आहे.   

शिवराज यादव | Updated: Apr 26, 2024, 08:22 PM IST
'दिनेश कार्तिकला T-20 वर्ल्डकप संघात घेण्यात काही अर्थ नाही,' युवराजने स्पष्टच सांगितलं, 'त्याला जर तुम्ही...' title=

Yuvraj Singh on Dinesh Karthik: आयपीएलध्ये दिनेश कार्तिक बंगळुरु संघाकडून खेळताना आपल्या तुफान फलंदाजीने सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. आपल्या या जबरदस्त कामगिरीने त्याने टी-20 वर्ल्डकप संघासाठी आपला विचार करण्यास निवड समितीला भाग पाडलं आहे. संधी मिळाल्यास आपण खेळू असं सांगत त्याने आपली इच्छाही बोलून दाखवली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगनेही (Yuvraj Singh) दिनेश कार्तिकच्या (Dinesh Karthik) आयपीएलमधील कामगिरीचं कौतुक केलं आहे. मात्र जर त्याला प्लेईंग 11 मध्ये स्थान मिळणार नसेल तर टी-20 वर्ल्डकप संघात घेण्यात अर्थ नाही असं स्पष्ट म्हटलं आहे. 

"दिनेश कार्तिक चांगली फलंदाजी करत आहे. 2022 च्या वर्ल्डकपमध्ये त्याची संघात निवड करण्यात आली होती. पण त्याला खेळण्याची संधी देण्यात आली नव्हती," असं युवराजने सांगितलं आहे. जर दिने कार्तिक प्लेइंग 11 मध्ये नसेल तर मग त्याची निवड करुन काही फायदा नाही असं त्याने म्हटलं आहे. यावेळी त्याने ऋषभ पंत, संजू सॅमसन हे दोघेही कुशल आणि कार्तिकपेक्षा तरुण खेळाडू असल्याचं सांगत त्यांची नावं सुचवली आहेत. 

'तुमचा फॉर्म लक्षात ठेवणार नाही, पण...', T-20 वर्ल्डकपआधी युवराज सिंगने रोहित, विराटला दिला इशारा

 

"जर दिनेश कार्तिक प्लेईंग 11 मध्ये  नसेल तर मला वाटत नाही की त्याची निवड करावी. तुमच्याकडे ऋषभ पंत, संजू सॅमसन आहेत. ते दोघेही जबरदस्त फॉर्ममध्ये आहेत. तसंच ते तरुणही आहेत. मला दिनेश कार्तिकला खेळताना पाहायला आवडेल. पण जर तो खेळणार नसेल तर त्याच्यापेक्षा तरुण आणि फरक पाडू शकतील अशा खेळाडूंची निवड करावी," असं युवराजने स्पष्टच म्हटलं.

दिनेश कार्तिक या आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करत आहे. खालच्या क्रमांकावर फलंदाजीला येत असतानाही त्याने 9 सामन्यात 262 धावा केल्या आहेत. त्याच्या या कामगिरीमुळेच वर्ल्डकप संघात त्याला स्थान द्यावं अशी मागणी होत आहे. 

2011 वर्ल्डकप विजेत्या संघाचा भाग असणाऱ्या युवराज सिंगला टी-20 वर्ल्डकपचा अॅम्बेसिडर बनवण्यात आलं आहे. दरम्यान टी-20 वर्ल्डकप संघ निवडण्यासाठी 1 मे अंतिम तारीख आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा प्रशिक्षक राहुल द्रविड आणि निवडसमिती प्रमुख अजित आगरकर यांची भेट घेण्याची शक्यता आहे. यानंतर 15 सदस्यीय संघाची घोषणा होईल. जून महिन्यात अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये वर्ल्डकप खेळला जाणार आहे. भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी अनेक खेळाडूंमध्ये स्पर्धा आहे. आयपीएलमध्ये काही खेळाडू जबरदस्त कामगिरी करत असल्याने निवड समितीसमोर अनेक पर्याय आहेत.