'भारताला दाखवून द्या तुम्ही किती ग्रेट आहात'; 'खेळ बिघडवण्याचा' इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचा सल्ला

World Cup India vs England: सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये इंग्लड नवव्या स्थानी आहे तर भारत अव्वल स्थानी आहे. इंग्लंडला एकच सामना जिंकला आला आहे तर भारताने आपले सर्व सामने जिंकले आहेत.

स्वप्निल घंगाळे | Updated: Oct 27, 2023, 02:53 PM IST
'भारताला दाखवून द्या तुम्ही किती ग्रेट आहात'; 'खेळ बिघडवण्याचा' इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचा सल्ला title=
भारताचा सहावा सामना इंग्लंडविरुद्ध होणार

World Cup India vs England: भारत आणि इंग्लंडमध्ये रविवारी लखनौमध्ये वर्ल्ड कप 2023 स्पर्धेमधील भारताचा 6 वा सामना होणार आहे. भारताने आतापर्यंत एकही सामना या स्पर्धेत गमावलेला नाही. तर दुसरीकडे इंग्लंडच्या संघाने आपल्या 5 पैकी केवळ एकाच सामन्यात विजय मिळवला आहे. बांगलादेश वगळता इंग्लंडला साधं अफगाणिस्तानलाही पराभूत करता आलेलं नाही. असं असतानाच भारत आणि इंग्लंडच्या सामन्यात भारताचं पारडं जड असल्याचं दिसत आहे. मात्र दुसरीकडे इंग्लंडच्या एका माजी कर्णधाराने इंग्लंडच्या संघाचं प्रोत्साहन वाढवण्याच्या नादात जरा जास्तच बडबड केल्याचं दिसत आहे. इंग्लंडच्या या माजी क्रिकेटपटूने भारताचा खेळ जोस बटलरच्या संघाने बिघडवावा, असा सल्ला दिला आहे. मूळात जिथे इंग्लंडच्याच संघाला अजून वर्ल्ड कपमध्ये सूर गवसेलेला नाही तिथं ते भारताचा खेळ कसा बिघडवणार अशी चर्चा क्रिकेट वर्तुळात सुरु आहे. 

नेमकं कोणी आणि काय म्हटलं आहे?

इंग्लंडच्या खेळाडूंनी संघात किती ग्रेट खेळाडू आहेत हे भारताविरुद्धच्या सामन्यात जगाला आणि भारताला दाखवून द्यावं असं इंग्लंडचा माजी कर्णधार नसीर हुसैन म्हणाला आहे. "मी इंग्लंडच्या संघाला इतकं वाईट खेळताना कधीच पाहिलेलं नाही. आधी दक्षिण आफ्रिका आणि नंतर ते श्रीलंकेविरुद्ध पराभूत झालेत," असं नसीर हुसैनने 'डेली मेल'मधील लेखात लिहिलं आहे. मात्र पुढे बोलताना इंग्लंडच्या या माजी कर्णधाराने भारताचा खेळ बिघडवण्याचा सल्ला जोस बटलरच्या संघाला दिला आहे. "इंग्लंडच्या संघाने लखनऊमध्ये रविवारी भारताचा स्पर्धेतील खेळ बिघडवला पाहिजे. त्यांनी भारताला आणि जगाला आठवण करुन दिली पाहिजे की ते किती ग्रेट क्रिकेटर्स होते आणि आजही आहेत," असं विधान हुसैनने या लेखात केलं आहे.

'3 आठवड्यात त्यांनी जे काही केलं ते...'

सध्याच्या वर्ल्ड कपमुळे इंग्लंड संघाला झालेली हानी भरुन काढण्यासाठी वेळ लागेल असंही हुसैनने म्हटलं आहे. मात्र या कामगिरीमुळे मागील 6-7 वर्षात इंग्लंडने जे मिळवलं आहे ते विसरलं जाणार नाही असं म्हणत हुसैनने आपल्या संघाला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. "व्हाइट बॉल क्रिकेटमध्ये मागील 6-7 वर्षांमध्ये त्यांनी दिलेला आनंद आपल्याला विसरता येणार नाही," अशी आठवण हुसैनने करुन दिली आहे. "त्यांनी जगभरातील फ्रेंचायजी लीगमध्ये जी कमाल केली आहे त्यामुळे जगभरातून इंग्लिश क्रिकेटपटूंना मागणी आहे. मात्र मागील 3 आठवड्यामध्ये त्यांनी जे केलं आहे ते त्यांच्या नावाला साजेसं नाही. इऑन मॉर्गन किंवा जोस बटरल या अशा सुमार कामगिरीसाठी ओळखले जात नाहीत," असंही हुसैनने म्हटलं आहे. 

पॉइण्ट्स टेबलमध्ये स्थिती काय?

सध्या पॉइण्ट्स टेबलमध्ये इंग्लड नवव्या स्थानी आहे तर भारत अव्वल स्थानी आहे असं असताना हुसैनच्या सल्ल्याप्रमाणे इंग्लंड नेमका कशापद्धतीने भारताचा खेळ बिघडवणार हे पाहण्यासारखं असेल असं म्हटलं जात आहे.