मोठी बातमी! Apple ने iPhone 14, iPhone 14 Plus ची किंमत केली कमी; पाहा नव्या किंमती

Apple Cuts Price of iPhone 14: आयफोन 15 ची घोषणा केल्यानंतर लगेचच कंपनीने आयफोन 14 च्या दोन्ही मॉडेलची किंमत कमी केली असून आता हा फोन अधिक स्वस्त झाला आहे. पाहा सविस्तर माहिती...

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 13, 2023, 01:25 PM IST
मोठी बातमी! Apple ने iPhone 14, iPhone 14 Plus ची किंमत केली कमी; पाहा नव्या किंमती title=
आयफोन 15 लॉन्च झाल्यानंतर किंमती केल्या कमी

Apple Cuts Price of iPhone 14: अ‍ॅपल कंपनीने आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लसच्या किमतींमध्ये मोठी कपात केली आहे. मंगळवारी अ‍ॅपलने आयफोन 15 ची घोषणा केल्यानंतर सध्या बाजारपेठेत उपलब्ध असलेल्या व्हेरिएंटवर कंपनीकडून घसघशीत सूट दिली जात आहे. अ‍ॅपलचे मुख्य कार्यकारी अधिकारी टीम कूक यांच्या नेतृत्वाखालील कंपनीने आयफोन 15, आयफोन 15 प्लस, आयफोन 15 प्रो, आयफोन 15 प्रो मॅक्स या 4 फोनची घोषणा क्युपर्टीनो येथील अ‍ॅपल पार्कमधील वंडरलस्ट इव्हेंटमध्ये केली.

किती होती या फोनची किंमत?

मागील वर्षी सप्टेंबर महिन्यामध्ये अ‍ॅपलने आयफोन 14 आणि आयफोन 14 प्लस लॉन्च केला होता. हे फोन लॉन्च केले तेव्हा आयफोन 14 ची किंमत 79,900 रुपयांना होता. तर आयफोन 14 प्लस हा 89,900 ला होता. मात्र आता नव्या आयफोन 15 सिरीजची घोषणा करण्यात आल्यानंतर अ‍ॅपलच्या अधिकृत वेबसाईटवर आयफोन 14 सिरीजमधील सर्वच डिव्हाइजच्या किंमतींमध्ये मोठी कपात करण्यात आली आहे.

आयफोन 14 आता कितीला मिळणार?

आयफोन 14 चं 128 जीबीचं व्हेरीएंट आता 69 हजार 900 रुपयांना उपलब्ध आहे. तर 256 जीबीचं व्हेरीएंट 79 हजार 900 रुपयांना विकत घेता येणार आहे. त्याचप्रमाणे याच फोनचं 512 जीबीचं व्हेरीएंट 1 लाखांच्या खाली आलं आहे. या व्हेरीएंटची किंमत 99 हजार 900 पर्यंत खाली आली आहे. 

आयफोन 14 प्लसची नवी किंमत किती?

आयफोन 14 प्लसचं 128 जीबीचं व्हेरीएंट आता 79 हजार 900 रुपयांना उपलब्ध आहे. तर 89 हजार 990 रुपयांना 256 जीबीचं व्हेरीएंट विकत घेता येईल. याच फोनचं 512 जीबीचं व्हेरिएंट 1 लाख 9 हजार 990 रुपयांना उपलब्ध आहे. 

नक्की पाहा >> iPhone एवढा महाग का असतो? जाणून घ्या यामागील 7 खास कारणं

कॅशबॅकही मिळणार

या शिवाय अ‍ॅपलच्या वेबसाईटवरुन खरेदी करणाऱ्या ग्राहकांना इंन्सटंट कॅशबॅक मिळणार आहे. 8 हजारांपर्यंत हा कॅशबॅक एचडीएफसीच्या क्रेडीट कार्डवर दिला जणार आहे. म्हणजे ही सूट एकूण 18000 रुपयांची होईल.

आयफोन 14 चे फिचर्स

आयफोन 14 मध्ये अ‍ॅपल ए 15 बायोनिक चीपसेट असून तो 128GB, 256GB आणि 512GB च्या स्टोरेज पर्यायांशी लिंक करता येतो. 6.1 इंचांचा सुपर रेटीना एक्सडीआर डिस्प्ले आयफोन 14 मध्ये देण्यात आला आहे. या स्क्रीनचं रेझोल्यूशन 2532X1170 पिक्सल्स इतकं आहे. यावर सिरॅमिक शिल्ड प्रोटेक्शनही देण्यात आलं आहे. या फोनमध्ये ड्युएल कॅमेरा सेटअप असून ज्यात 12 मेगापिक्सल प्रायमरी सेन्सर रेअर कॅमेरा आहे. तर दुसरा 12 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड सेन्सर कॅमेरा आहे. 

आयफोन 14 प्लसचे फिचर्स

आयफोन 14 प्लसमध्ये 6.7 इंचांचा सुपर रेटीना एक्सडीआर डिस्प्ले देण्यात आला असून या फोनमध्ये ए 15 बायोनिक चीपसेट आहे. हा फोन आयओएस 16 ऑप्रेटिंग सिस्टीमवर चालतो. आयफोन 14 प्लस चे 128GB, 256GB आणि 512GB असे 3 पर्याय उपलब्ध आहेत.