iPhone 15 सिरीजचं ISRO कनेक्शन; वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान

iPhone 15 Series ISRO Connection: काही दिवसांपूर्वीच जागतिक माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील आघाडीची कंपनी असलेल्या अ‍ॅपलने आपल्या नवीन आयफोन सिरीजची घोषणा केली. 

स्वप्निल घंगाळे | Updated: Sep 16, 2023, 04:05 PM IST
iPhone 15 सिरीजचं ISRO कनेक्शन; वाचून तुम्हालाही वाटेल अभिमान title=
नुकत्याच रिलीज झालेल्या आयफोनचं इस्रो कनेक्शन आलं समोर

iPhone 15 Series ISRO Connection: अ‍ॅपल कंपनीने आपल्या आयफोन 15 सिरीजची नुकतीच घोषणा केली. मात्र जगभराचं लक्ष लागून राहिलेल्या या आयफोन 15 चं भारतीय अंतराळ संस्था म्हणजेच इस्रोबरोबर खास कनेक्शन आहे असं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल नाही का? पण हे खरं आहे. अ‍ॅपलच्या आयफोन 15 प्रो मॉडेल्समध्ये भारतामध्ये स्वदेशी बनावटीचं जीपीएस नॅव्हआयसी (NavIC) चा समावेश करण्यात आला आहे. NavIC हे भारतीय बनावटीचं जीपीएस इस्रोची निर्मिती आहे. हे एक नेव्हीगेशन सॉफ्टवेअर आहे. अमेरिकी सरकारच्या माध्यमातून चालवल्या जाणाऱ्या ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीमचं ही भारतीय अवृत्ती आहे असं सोप्या भाषेत सांगता येईल.

कंपनीच्या साईटवर मिळेल माहिती

NavIC ने आणि क्वॉलकॉमबरोबर काम करुन हे नेव्हिगेशन तंत्रज्ञान मोबाईलमधील चीपसेटमध्ये वापरलं. आता इस्रोने अ‍ॅपलबरोबर एकत्र येत A17 Pro चिपसेटवर काम केलं आहे. याच माध्यमातून त्यांनी आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्समध्ये NavIC इंटीग्रेट केलं आहे. आयफोन 15 प्रो मॉडेल्सचे स्पेसिफिकेशन्स अ‍ॅपलच्या साईटवर पहिल्यास त्यामध्ये ही माहिती दिसेल. या ठिकाणी GPS, GLONASS, Galileo, QZSS, BeiDou आणि NavIC हे नेव्हिगेशन पर्याय फोनमध्ये असल्याचं दिसून येईल.

इथेही केला जातो वापर

NavIC चा यापूर्वी आयफोन 15 प्रो आणि आयफोन 15 प्रो मॅक्समध्ये समावेश करण्यात आलेला नव्हता. इस्रोनंतर जीपीएसला पर्याय म्हणून NavIC चा सक्रीयपणे वापर शिओमीचा एमआय 11 एक्स, 11 टी प्रोबरोबरच वनप्लस नॉर्ड 2 टी, रिअलमी 9 प्रो सारख्या स्मार्टफोनमध्ये वापर केला जातो. 

7 उपग्रहांच्या माध्यमातून करतं काम

NavIC लोकेशनसंदर्भातील सेवा पुरवण्याचं काम करतं. या माध्यमातून स्टॅण्डर्ड पोझिशनिंग सर्व्हिस पुरवली जाते. तसेच सुरक्षा यंत्रणा आणि लष्करासाठी ही सेवा इन्स्क्रीप्टेड असते. NavIC यंत्रणा 7 उपग्रहांच्या माध्यमातून कार्यन्वयित आहे. यापैकी 3 जीओ स्टेशनरी अर्थ ऑर्बिट उपग्रह आहेत. तर 4 जिओसिंक्रोनोकस ऑर्बिट प्रकारचे उपग्रह आहेत. आयफोन 15 सिरीजमधील प्रोडक्ट हे भारतामध्येच तयार करण्यात येणार आहेत. मेड इन इंडिया म्हणजेच भारतात निर्माण केले जाणारे आयफोन हे जगभरामध्ये पाठवले जाणार आहेत. त्यामुळेच ही भारतीयांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. त्यातच आता आयफोनसारख्या जागतिक दर्जाच्या उत्पादनांमध्ये इस्रोने तयार केलेल्या पर्यायी जीपीएसचा समावेश करण्यात आल्याने इस्रोचा डंका जगभरामध्ये वाजणार आहे. आयफोनमध्ये इस्रोने तयार केलेली ही यंत्रणा वापरलं जाणं हे इस्रोसाठी मोठं यश असल्याचं मानलं जात आहे. या माध्यमातून इस्रोच्या निर्मितीवर आयफोनची मोहर उमटल्याचंही बोललं जात आहे.