New Car: 'या' 6 लाखांच्या गाडीची विक्री 883 टक्क्यांनी वाढली; Maruti आणि Tata ची झोप उडली!

Citroen Car Sales: फ्रान्समधील कार निर्माता कंपनी असलेल्या सिट्रोएन (Citroen) ही भारतीय बाजारपेठेमधील फारच नवी कंपनी आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये या कंपनीला फारसा अनुभव नाही. मात्र असं असतानाही या कंपनीने सुरुवातीलाच पकडलेला वेग हा चर्चेचा विषय ठरत आहे.

Updated: Jan 25, 2023, 08:50 PM IST
New Car: 'या' 6 लाखांच्या गाडीची विक्री 883 टक्क्यांनी वाढली; Maruti आणि Tata ची झोप उडली! title=
Citroen Car Sales Growth

Citroen Car Sales Growth: फ्रान्समधील प्रमुख वाहननिर्मिती कंपन्यांपैकी एक असलेल्या सिट्रोएनने (Citroen) भारतीय बाजारपेठेमध्ये दमदार प्रवेश केला आहे. भारतीय बाजारपेठेमध्ये फारसा अनुभव नसूनही कंपनीची सुरुवातीची कामगिरी अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे. ही गाडी सध्या भारतीय बाजारपेठेमध्ये दमदार दाम कामगिरी करत असून अनेक दिग्गज कंपन्या यामुळे खडबडून जाग्या झाल्या आहेत. सन 2022 मध्ये सिट्रोएनच्या वार्षिक विक्रीमध्ये 883 टक्क्यांची वाढ झाली आहे. सिट्रोएनच्या विक्रीने वार्षिक विक्रीच्या आधारे विचार केल्यास फारच मोठी झेप घेतली आहे. मारुति सुजुकी (maruti suzuki), हुंडाई (hyundai), टाटा मोटर्स (tata motors), महिंद्रा (mahindra), किआ (kia), टोयोटा (toyota), होंडा (honda) यासारख्या नामवंत कंपन्यांनाही विक्रीच्या बाबतीत या नव्या कंपनीने मागे टाकलं आहे. 

बड्या कंपन्यांना धोबीपछाड

सन 2022 मध्ये मारुति सुजुकीच्या विक्रीमध्ये 15 टक्के, हुंडाईच्या विक्रीमध्ये 9 टक्के, टाटा मोटर्सच्या विक्रीमध्ये 59 टक्के, महिंद्राच्या विक्रीमध्ये 65 टक्के, किआच्या विक्रीत 40 टक्के वाढ झाल्याचं पहायला मिळालं. त्याचबरोबरच टोयोटाची विक्री ही 23 टक्क्यांनी, होंडाची विक्री 7 टक्क्यांनी वाढली. मात्र याच कालावधीमध्ये सिट्रोएनची विक्री तब्बल 883 टक्क्यांनी वाढली आहे. म्हणजेच भारतामध्ये ही कंपनी फारच वेगाने पाय पसरताना दिसत आहे. या कंपनीचे केवळ दोनच मॉडेल भारतामध्ये लॉन्च झाले आहेत. 

केवळ दोन मॉडेल्सच्या जोरावर गाठला पल्ला

भारतामध्ये सिट्रोएन केवळ सिट्रोएन सी फाइव्ह एअरक्रॉस (Citroen C5 Aircross) आणि सिट्रोएन सी थ्री (Citroen C3) या दोनच गाड्या विकते. यापैकी सिट्रोएन सी थ्रीची सर्वाधिक विक्री होत आहे. ही एक बजेट कार असून भारतामध्ये या कारची किंमत सहा लाख रुपये इतकी आहे. कंपनीची विक्री वाढवण्यामागे या कारचा मोठा हातभार आहे. सध्या ही कार आयसीई व्हर्जनमध्ये उपलब्ध असून लवकरच कारचं इलेक्ट्रिक व्हर्जन लॉन्च केलं जाणार असल्याची माहिती कंपनीने दिली आहे. ही सुद्धा एक बेजेट इलेक्ट्रिक कार असेल असं कंपनीने म्हटलं आहे. ही कार इलेक्ट्रिक बाजारपेठेमध्ये टाटा टियागोला टक्कर देणार आहे. 

कशी आहे ही गाडी?

सिट्रोएन सी थ्री दोन इंजिन ऑप्शनसहीत उपलब्ध आहे. 1.2 लीटर नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल (82 पीएस/115 एनएम) आणि 1.2 लीटर टार्बोचार्ज पेट्रोल इंधन (110 पीएस/190 एनएम) हे दोन पर्याय या कारमध्ये उपलब्ध आहेत. या कारमध्ये 5 स्पीड मॅन्युएल गेअरबॉक्स आणि 6 स्पीड मॅन्युएल गेअरबॉक्सचा पर्याय देण्यात आला आहे. ही कार केवळ पेट्रोलच्या पर्यायामध्ये उपलब्ध असून डिझेल कार उपलब्ध नाही. या कारमध्ये ऑटोमॅटिक ट्रान्समिशनचा पर्यायही उपलब्ध नाही.