कमाल! वाढीव स्टोरेजसह Apple नं लाँच केला नवा आयपॅड; भरतात त्याची किंमत किती, फिचर्स काय? पाहा एका क्लिकवर

Apple launches iPad Air : अॅपलचा आयपॅड घ्यायचा विचार करताय? तुमची प्रतीक्षा फळली असं म्हणणं गैर ठरणार नाही. कारण, कंपनीनं लाँच केलेला नवा आयपॅड पाहून गॅजेटप्रेमी अवाक्.   

सायली पाटील | Updated: May 8, 2024, 12:18 PM IST
कमाल! वाढीव स्टोरेजसह Apple नं लाँच केला नवा आयपॅड; भरतात त्याची किंमत किती, फिचर्स काय? पाहा एका क्लिकवर title=
tech news Apple launches iPad Air know size Price and other details

 Apple launches iPad Air : अॅपल या जगविख्यात कंपनीकडून आतापर्यंत गॅजेटप्रेमीच्या अपेक्षांची पूर्तता करत एकाहून एक सरस गॅजेट तयार करण्यात आले आहेत. आधुनिक तंत्रज्ञानाच्या जोडीनं नवनवीन स़ॉफ्टवेअरनं परिपूर्ण असणाऱ्या अॅपलच्या या गॅजेटमध्ये आता नव्यानं आणखी काही गॅजेटची भर पडली आहे. नुकत्याच पार पडलेल्या एका इवेंटमध्ये Apple नं चार नवे iPads लाँच केले. 

अॅपलच्या या आय़पॅडमधील एक म्हणजे iPad Air. सध्या हा iPad Air 11 आणि 13 इंच अशा दोन आकारांमध्ये उपलब्ध करून देण्यात आला आहे. तर, iPad pro ला पूर्णपणे नव्या रुपात सादर करण्यात आलं आहे. या आयपॅड प्रोमध्ये कंपनीनं M4 चिपसेट देत एक नवा लूकही दिला आहे. कंपनीकडून करण्यात आलेल्या दाव्यानुसार हा आतापर्यंतचा सर्वात कमी जाडीचा आयपॅड आहे. 

फक्त आयपॅडच नव्हे, तर अॅपलनं मॅजिक कीबोर्ड आणि अॅपल पेन्सिलमध्येही अपडेट केली आहे. आयपॅड प्रो ची जाहिरात करण्यासाठी म्हणून कंपनीकडून एक सुरेख व्हिडीओसुद्धा शेअर करण्यात आला आहे. जिथं अतिशय कलात्मकपणे कंपनीकडून आयपॅड सर्वांसमोर आणला गेला आहे. 

Video तयार करणाऱ्यांसाठी iPad Pro उत्तम पर्याय 

M4 चिपसेटच्या iPad Pro मधून मल्टीमीडियाचं काम करणाऱ्यांना बरीच मदत होणार असल्याचा दावा अॅपलकडून करण्यात आला आहे. किमान वीजेच्या वापरासह काम करणाऱ्या या आयपॅडमध्ये उत्तम डिस्प्ले टेक्नोलॉजीचा वापर करण्यात आला आहे. इतकंच नव्हे, तर त्यात CPU, GPU, न्यूरल इंजनसोबतच मेमरी सिस्टीमही अपडेट करण्यात आली आहे. नवनवीन अॅप आणि व्हिडीओच्या दृष्टीनं अॅपलचा हा नवा आयपॅड एक उत्तम पर्याय ठरणार आहे. 

हेसुद्धा वाचा : चाललंय काय? Air India च्या अनेक कर्मचाऱ्यांनी अचानक Sick Leave घेतल्यानं 70 उड्डाणं रद्द 

13 इंचांच्या iPad Pro ची जाडी 5.3 मिलीमीटर असून, 11 इंचांच्या आयफोन प्रोची जाडी 5.1 मिलीमीटर इतकी आहे. आयपॅडचा परफॉर्मन्स उत्तम ठेवण्यासाठी आणि वापरादरम्यानच्या समस्या दूर करण्यासाठी आयपॅडवर ग्रेफिनचा एक थरही जोडण्यात आला आहे. या आयपॅडवर असणारा अॅपलचा लोगो तांब्यापासून तयार करण्यात आला असून, त्यामुळं तो गरम होण्याची समस्या दूर होईल असं कंपनीचं म्हणणं आहे. 

किंमतही खिशाला परवडणारी 

भारतात अॅपलकडून iPad Air चार रंगांमध्ये उपलब्ध करून देण्यात असून, त्याची किंमतही अनेकांच्या खिशाला परवडणारी आहे. अधिकृत माहितीनुसार 13 इंचांच्या iPad Air ची किंमत 79,900 रुपये तर, 11 इंचांच्या iPad Air ची Base Value 59,900 रुपये इतकी आहे. भारतात डिलीव्हरी आणि दुकानांवरील विक्रीसाठी मात्र तुम्हाला 15 मे पर्यंतची वाट  पाहावी लागणार आहे. 

दरम्यान, बहुचर्चित अशा 11 इंचांच्या iPad Pro ची भारतातील किंमत आहे 99,900 रुपये आणि 13 इंचांच्या iPad Pro ची किंमत आहे 1,49,900 रुपये. अॅपलच्या या आयपॅडमध्ये दुपटीनं स्टोरेज व्यवस्था देण्यात आल्यामुळं युजर्ससाठी ही आनंदाची बातमी आणि एक मोठा दिलासा ठरत आहे. अॅपलचा  iPad Air सध्या 128GB सह आणि iPad Pro मॉडेल 256GB स्टोरेजसह विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. अॅपलनं स्टोरेजवर काम केल्यामुळं आता या आयपॅडना युजर्सची नेमकी किती पसंती मिळते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.