Maharashtra Weather News : उष्णतेच्या लाटेमध्येच राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज

Maharashtra Weather News : उकाडा आणखी वाढणार... राज्याच्या काही भागांमध्ये होणारा अवकाळी पाऊस अडचणी आणखी वाढवणार.   

सायली पाटील | Updated: May 8, 2024, 08:45 AM IST
Maharashtra Weather News : उष्णतेच्या लाटेमध्येच राज्याच्या 'या' भागात विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज  title=
Maharashtra Weather News vidarbha and marathwada to experiance unseasonal rain heatwave in mumbai

Maharashtra Weather News : देशाच्या उत्तरेपासून दक्षिणेपर्यंत सध्या प्रचंड उकाडा वाढला असून, त्यामुळं जनसामान्यांच्या जीवनावर परिणाम होताना दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये हवामान विभागानं उष्ण रात्रींचा इशारा दिलेला असतानाच विदर्भ आणि मराठवाड्यात मात्र अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 

हवामान विभागाच्या सविस्तर वृत्तानुसार, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांच्या जोडीनं हलका पाऊस होण्याची शक्यता आहे. यादरम्यान वाऱ्याचा वेग 30-40 kmph इतका असेल. तर, विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह वादळ आणि सोसाट्याचा वारा (40-50 kmph), तसंच हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हेसुद्धा वाचा : Loksabha Election 2024: आता तयारी चौथ्या टप्प्याची! दिवस सभांचा

अमरावती, नागपूर आणि वर्ध्यामध्ये गारपीटीचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भाच्या पूर्वेपासून तेलंगणा, कर्नाटक आणि तामिळनाडूपर्यंत कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्यामुळं राज्यातील हवामानात सातत्यानं हे बदल होत आहेत. 

एकिकडे राज्यात अवकाळी थैमान घालत असतानाच हवामानाच्या या विचित्र स्थितीमुळं कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि उर्वरित भागामध्ये तापमानात वाढ झाल्याचं पाहायला मिळेल. विदर्भातही पाऊस होण्याची शक्यता असली तरीही उकाड्यापासून तूर्तास दिलासा मिळणार नाहीय. राज्यात सध्या सर्वाधिक तापमानाचा आकडा 44 अंशांच्याही पलिकडे गेल्यामुळं उष्णतेचा दाह दिवसागणिक अडचणी वाढवताना दिसत आहे. पुढील काही दिवस तरी, या स्थितीमध्ये फारसे बदल अपेक्षित नसल्यामुळं नागरिकांनी या वातावरणात आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन यंत्रणांमार्फत केलं जात आहे. 

देश स्तरावरील हवामानाचा आढावा घ्यायचा झाल्यास, Skymet च्या वृत्तानुसार पुढील 24 तासांमध्ये गुजरात, तामिळनाडू, कर्नाटकचा अंतर्गत भाग आणि राजस्थानच्या पश्चिम भागामध्ये उष्ण वारे वाहणार आहेत. तर, पूर्वोत्तर भारतापसून दक्षिण कर्नाटक आणि उत्तर प्रदेशातील काही भागांमध्ये पावसाची हजेरी असेल. पावसाची ही क्रिया धीम्या गतीनं वेग धारण करणार असून, मे महिन्याच्या अखेरी मान्सूनसाठी पोषक वातावरण निर्मितीची शक्यता वर्तवली जात आहे.