रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या! EVM आरतीची थेट पुणे पोलिसांकडून दखल

Maharashtra Politician Booked By Police In Pune: मंगळवारी सकाळी प्रत्यक्ष मतदानाला सुरुवात होण्याआधी त्या मतदानकेंद्रावर पोहचल्या आणि त्यांनी ईव्हीएम मशिन ठेवतात त्या 'मार्कींग कम्पार्टमेंट'ची आरती केली.

स्वप्निल घंगाळे | Updated: May 8, 2024, 08:55 AM IST
रुपाली चाकणकरांच्या अडचणी वाढल्या! EVM आरतीची थेट पुणे पोलिसांकडून दखल title=
सोशल मीडियावर हा फोटो व्हायरल झाला

Maharashtra Politician Booked By Police In Pune: महाराष्ट्रात मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील मतदान पार पडलं. महाराष्ट्रात देशातील सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 61.44 टक्के मतदान झालं. मात्र मतदानाच्या दिवशी अजित पवार गटाच्या नेत्या रुपली चाकणकर यांनी केलेल्या एका कृतीमुळे त्या अडचणीत आल्या आहेत. महाराष्ट्रातील महिला आयोगाच्या अध्यक्ष असलेल्या रुपाली चाकणकर यांनी एका मतदानकेंद्रावर चक्क आरती केली. मतदानकेंद्रावरील पोलिंग बुथची आरती करतानाचे चाकणकर यांचे फोट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर निवडणूक आयोगाला जाग आली. 

अनेकांनी निवडणूक आयोगाकडे नोंदवला आक्षेप

निवडणूक केंद्रावर मतदान करण्यासाठी ईव्हीएम मशिन्स ठेवल्या जातात त्या ठिकाणी असलेल्या 'मार्कींग कम्पार्टमेंट'ची आरती केली. 'मार्कींग कम्पार्टमेंट' ओवाळतानाचा चाकणकर यांचा फोटो व्हायरल झाला. हा फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी सोशल मीडियावरुन यासंदर्भात आक्षेप नोंदवला. काहींनी तर थेट निवडणूक आयोगाला टॅग करुन हा फोटो पोस्ट केला. मतदानकेंद्रामध्ये हे असं करणं नियमांमध्ये बसतं का? अशी विचारणा अनेकांनी निवडणूक आयोगाच्या हॅण्डलला टॅग करुन केली. 

चाकणकर यांनी नेमकं केलं काय?

चाकणकर यांनी मंगळवारी मतदानाला सुरुवात होण्याआधी खडकवासला येथील मतदारकेंद्रावर पोहचल्या. मतदानाला सुरुवात होण्याआधी त्यांनी मतदानकेंद्रात प्रवेश केला. यावेळेस त्यांच्या हातात ओवाळणीसाठीचं आरतीचं ताट आणि त्यामध्ये दिवा लावलेला होता. चाकणकर यांनी घरातील देवाऱ्यासमोर आपण ताट ओवाळून आरती करतो त्याप्रमाणे आरती केली. पण याकडे अनेकांनी निवडणूक आयोगाचं लक्ष वेधल्यानंतर स्थानिक पोलिसांना जाग आली आहे. सिंहगड रोड पोलिसांनी या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केला आहे. निवडणुकीदरम्यान मतदानाशीसंबंधित साहित्य हाताळण्याचा अधिकार अगदीच मोजक्या लोकांना असतो. त्यामुळेच यासंदर्भातील नियम अगदी कठोर असतात. आता या प्रकरणात चाकणकर यांच्याविरोधात काय कारवाई होते हे येणाऱ्या दिवसांमध्ये स्पष्ट होईल. मात्र त्यांच्या अडचणी वाढण्याची चिन्ह सध्या दिसत आहेत.

चाकणकर यांचं स्पष्टीकरण

रुपाली चाकणकर यांनी सर्वच पक्षांचे नेते आरती करताना मतदानकेंद्रात होते असं सांगताना एक फोटो पोस्ट केला आहे. "माहिती न घेता ट्विट करणाऱ्यांसाठी... फोटोमध्ये डाव्या बाजूला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खडकवासला विभागप्रमुख भरत आबा कुंभारकर व उजव्या बाजूला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे ओबीसीचे अध्यक्ष बाळासाहेब रायकर आहेत," अशी कॅप्शन त्यांनी फोटोला दिली आहे.

चाकणकर म्हणाल्या, 'व्हिडीओ रेकॉर्ड करुन ठेवा की...'

खडकवासल्याचा परिसर बारामती मतदारसंघात येतो. या ठिकाणी सुनेत्रा पवार आणि सुप्रिया सुळे आमने-सामने आहेत. बारामतीच्या विद्यमान आमदार असलेल्या सुप्रिया यांना त्यांच्या नणंदेनेचं आव्हान दिलं आहे. मतदानकेंद्राबाहेर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना रुपाली चाकणकर यांनी सुनेत्रा पवार विजयी होतील असा विश्वास व्यक्त केला. पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना चाकणकर यांनी, "माझा हा व्हिडीओ रेकॉर्ड करुन ठेवा. आपण निकाल लागल्यानंतर 4 जूनला भेटूच पण आताच माझा व्हिडीओ रेकॉर्ड करुन ठेवा की सुनेत्रा पवार ही निवडणूक एक लाखांच्या मताधिक्याने जिंकल्या," असं म्हणत प्रतिक्रिया नोंदवली.