'प्रेमम' सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित; २९ नोव्हेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला

‘प्रेमम्’ या सिनेमाचा पोस्टर लॉँच सोहळा नुकताच या सिनेमाचे दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे यांच्या वाढदिवसा निमित्त पार पडला. नुकताच त्यांनी या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे.

Updated: Apr 26, 2024, 04:06 PM IST
'प्रेमम' सिनेमाचं पोस्टर प्रदर्शित; २९ नोव्हेंबरला चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला title=

मुंबई : एम आर जोकर एंटरटेनमेंट एल एल पी प्रस्तुत आणि गोल्डन स्ट्राईप्स एंटरटेनमेंट एल एल पी निर्मिति 'प्रेमम्’ सिनेमा येत्या २९ नोव्हेंबर २०२४ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. धर्म, जात यांच्या नावाखाली स्वतःसह दुसऱ्याच्याही आयुष्याची राखरांगोळी करणाऱ्या तरुणांच्या डोळ्यांत झणझणीत अंजन घालून त्यांना खऱ्या प्रेमाची ओळख करून देण्याचा प्रयत्न म्हणजे ‘प्रेमम्’ चित्रपट होय. भविष्यातील खरी ताकद असलेल्या तरुण पिढीचा डळमळीत होणारा आत्मविश्वास पुन्हा मिळवून देणारा परिपूर्ण फॅमिली एंटरटेनमेंट असलेला हा सिनेमा आहे. ‘प्रेमम्’ या सिनेमाचा पोस्टर लॉँच सोहळा नुकताच या सिनेमाचे दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे यांच्या वाढदिवसा निमित्त पार पडला. नुकताच त्यांनी या सिनेमाचे पोस्टर सोशल मीडियावर शेअर केले आहे. या पोस्टरमध्ये अभिनेता रोहीत राव नरसिंगे आणि अभिनेत्री चैताली चव्हाण झळकले आहेत. या सिनेमाचे पोस्टर पाहता हा सिनेमा उत्कंठावर्धक असणार आहे याची प्रचिती होते.

अभिनेता - दिग्दर्शक रोहित राव नरसिंगे प्रेमम् या सिनेमाच्या पोस्टरविषयी सांगतात, “प्रेम म्हणजे नेमके काय आणि प्रेम विवाह म्हणजे काय यातील फरक दाखविण्याचा प्रयत्न या सिनेमातून दर्शविला जाईल. कॅप्टन फैरोज अन्वर माजगावकर, महादेव अशोक चाकणकर आणि आदित्य देशमुख यांची निर्मिती असलेल्या या सिनेमाचे दिग्दर्शन मी स्वतः केलं असून कथा, संवाद देखील मी केले आहेत. प्रथेप्रमाणे एखाद्या सिनेमाचा मुहूर्त सिनेक्षेत्रातील नामांकित मंडळी, राजकारणी अथवा इतर मान्यवरांच्या हस्ते केला जातो. मात्र या सिनेमाच्या टीमने अशा पारंपरिक प्रथेला बगल देत एक वेगळाच पायंडा पाडला आहे. ‘प्रेमम्’ सिनेमाच्या चित्रीकरणाचा मुहूर्त दिनांक १० जून २०२४ रोजी चालू होणार असून पहिल्यांदाच विजय सुखलाल चव्हाण यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात येणार आहे.” 

पुढे ते सांगतात, “अभिनेता  रोहित राव नरसिंगे, साहिल कुम्मार, शशिकांत ठोसर,आणि अभिनेत्री चैताली विजय चव्हाण व केतकी पायगुडे हे कलाकार प्रमुख भूमिका करत असून, फैरोज अन्वर माजगवकर यांचा अभिनय देखील सिनेमात पाहायला मिळणार आहे. गीतकार  डॉ. विनायक पवार,यांच्या लेखणीतून सजलेल्या गाण्यांना सनी - सुशांत यांनी संगीत दिलं आहे. गायक अरिजित सिंग, श्रेया घोषाल,जावेद अली  या सारख्या  गायकांच्या विविधांगी आवाजांचा स्वरसाज सिनेमातील गाण्यांना चढला जाऊ शकतो. बाल कलाकार आदिन माजगवकर यांच्या खुमासदार अभिनयाची झलक यातून पाहायला मिळणार आहे. या सिनेमाच्या निमित्ताने २९ नोव्हेंबर पासून महाराष्ट्रात 'प्रेमम्' ची लाट लागू होणार आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.”