शरीरातील Iron ची कमतरता आणि थॅलेसेमिया यांच्यातील नेमका फरक काय?

World Thalassemia Day : थॅलेसेमिया हा एक गंभीर आजार आहे. हा आज लाल रक्त पेशींसी जोडला गेलेला आहे. यामध्ये शरीरातील हिमोग्लोबीनचे प्रमाण अतिशय कमी असते. या आजाराबाबत जागृकता निर्माण करण्यासाठी 'जागतिक थॅलेसेमिया डे' साजरा केला जातो. या निमित्ताने आयर्न आणि थॅलेसेमिया यांच्यातील फरक डॉक्टर यांच्याकडून समजून घेऊया. 

दक्षता ठसाळे-घोसाळकर | Updated: May 8, 2024, 07:31 AM IST
शरीरातील Iron ची कमतरता आणि थॅलेसेमिया यांच्यातील नेमका फरक काय? title=

थॅलेसेमिया हा एक प्रकारचा रक्त विकार आहे ज्यामध्ये पीडित व्यक्तीच्या लाल रक्तपेशी किंवा लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिनची पातळी अत्यंत कमी प्रमाणात तयार होते. थॅलेसेमिया हा एक गंभीर आणि जीवघेणा आजार आहे. शरीराच्या लाल रक्तपेशींमध्ये हिमोग्लोबिन असते, ज्याचे कार्य फुफ्फुसातून शरीराच्या इतर भागांना ऑक्सिजन पुरवणे आहे. परंतु, थॅलेसेमिया रुग्णांमध्ये हिमोग्लोबिनची पातळी नेहमीच कमी राहते. थॅलेसेमिया हा अनुवांशिक आजार असून भारतात या आजाराने ग्रस्त मुलांची संख्या देखील चिंताजनक आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतात दरवर्षी सुमारे 7 ते 10 हजार अशी मुले जन्माला येतात ज्यांना आनुवंशिक थॅलेसेमिया होतो. थॅलेसेमिया या गंभीर आजाराबाबत जागरूकता वाढवण्यासाठी दरवर्षी 'जागतिक थॅलेसेमिया दिन' साजरा केला जातो.

लोहाची कमतरता आणि थॅलेसेमिया हे दोन वेगवेगळे विकार आहेत जे शरीरातील निरोगी लाल रक्तपेशी निर्माण करण्याच्या क्षमतेवर परिणाम करतात, परंतु त्यांची मूळ कारणे, लक्षणे आणि उपचार पद्धतीं भिन्न आहेत. अचूक निदान आणि योग्य व्यवस्थापनासाठी या विकारांमधील फरक समजून घेणे महत्त्वाचे आहे. यासाठी डॉ. आकाश शाह आयर्न आणि थॅलेसेमिया यांच्यातील फरक समजावून सांगत आहेत. 

लोह कमतरता

शरीरात हिमोग्लोबिन तयार करण्यासाठी लोहाची कमतरता असते, तेव्हा लोहाच्या कमतरतेचा ऍनिमिया  होतो. लाल रक्तपेशींमधील प्रथिने संपूर्ण शरीरातील ऊतींमध्ये ऑक्सिजन वाहून नेतात. लोहाची कमतरता विविध कारणांमुळे होऊ शकते, ज्यामध्ये आहारात लोहाचे योग्य प्रमाण नसणे, रक्त कमी होणे (जसे की मासिक पाळी किंवा गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रक्तस्त्राव) किंवा लोहाचे योग्य प्रकारे शोषण न होणे समाविष्ट आहे.

लक्षणे: ऍनिमियाच्या सामान्य लक्षणांमध्ये थकवा, अशक्तपणा, मलूल त्वचा, श्वास लागणे, चक्कर येणे, डोकेदुखी, हात पाय गार पडणे, नखे ठिसूळ होणे आणि अखाद्य पदार्थ खाण्याची उर्मी (पीआयसीए) यांचा समावेश होतो

निदान: हिमोग्लोबिन, हेमॅटोक्रिट, सीरम आयर्न, फेरीटिन आणि टोटल आयर्न-बाइंडिंग कपॅसिटी (टीआयबीसी) ची पातळी मोजणाऱ्या रक्त चाचण्यांद्वारे निदान केले जाते. या मार्करची पातळी कमी असणे म्हणजे लोह कमतरतेचा ऍनिमिया .

उपचार: उपचारांमध्ये सामान्यतः लोहाची कमतरता भरून काढण्यासाठी आयर्न सप्लिमेंटस घेण्याचा समावेश असू शकतो. आयर्न सप्लिमेंटस विविध स्वरूपात उपलब्ध आहेत. ज्यात फेरस सल्फेट , फेरस ग्लुकोनेट आणि फेरस फ्युमरेट यांचा समावेश आहे. लीन मीट, पोल्ट्री, मासे, बीन्स, मसूर,  तृणधान्ये आणि पालेभाज्या यांसारख्या लोहयुक्त पदार्थांचा समावेश करण्यास सांगितले जाते.

थॅलेसेमिया

थॅलेसेमिया हा एक अनुवांशिक रक्त विकार आहे. हिमोग्लोबिनचे असामान्य उत्पादन हे त्याचे लक्षण असून त्यामुळे लाल रक्तपेशींचे उत्पादन कमी होते आणि ॲनिमिया होतो. थॅलेसेमियाचे दोन मुख्य प्रकार आहेत: अल्फा थॅलेसेमिया आणि बीटा थॅलेसेमिया, हिमोग्लोबिनचा रेणूच्या कोणत्या भागावर परिणाम होतो यावर कोणता प्रकार आहे अवलंबून असते.

लक्षणे: थॅलेसेमियाची लक्षणे विकाराचा प्रकार आणि तीव्रतेनुसार मोठ्या प्रमाणात बदलू शकतात. सौम्य स्वरूपामध्ये कोणतीही लक्षणे दिसत नाहीत किंवा माइल्ड ऍनिमिया नसतो, तर गंभीर स्वरूपामध्ये अधिक तीव्र ऍनिमिया, थकवा, अशक्तपणा, मलूल किंवा कावीळी मध्ये होते तशी त्वचा होणे, हाडांची बेढबता, प्लीहा वाढणे आणि मुलांमध्ये प्रगती मंदावणे अशी लक्षणे दिसून येतात. 

निदान: थॅलेसेमियाचे निदान सामान्यत: रक्त चाचण्यांनी करण्यात येते. ज्यामध्ये  हिमोग्लोबिन पातळी मोजून हिमोग्लोबिन पॅटर्न असामान्य आहे का हे पाहण्यात येते. थॅलेसेमियाचा विशिष्ट प्रकार आणि तीव्रता निश्चित करण्यासाठी अनुवांशिक चाचणीसारख्या अतिरिक्त चाचण्या आवश्यक असू शकतात.

उपचार: थॅलेसेमियावरील उपचार विकाराचा प्रकार आणि तीव्रतेनुसार बदलतात. सौम्य प्रकरणांमध्ये उपचारांची आवश्यकता नसते, तर गंभीर प्रकरणांमध्ये हिमोग्लोबिन पातळी योग्य ठेवण्यासाठी आणि लक्षणे कमी करण्यासाठी नियमित रक्त संक्रमण आवश्यक असू शकते. इतर उपचारांमध्ये शरीरातील अतिरिक्त लोह काढून टाकण्यासाठी आयर्न चेलेशन थेरपी, फॉलिक ॲसिड सप्लिमेंट्स आणि गंभीर प्रकरणांमध्ये, बोन मॅरो किंवा स्टेम सेल प्रत्यारोपण यांचा समावेश असू शकतो.

लोहाच्या कमतरतेमुळे होणारा ॲनिमिया आणि थॅलेसेमिया हे वेगळे विकार असून त्यांची  लक्षणे आणि उपचार पद्धतीं वेगवेगळ्या  आहेत. दोनही विकारासाठी, योग्य उपचार पद्धती निश्चित करण्यासाठी, डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य निदान करून घेणे आवश्यक आहे.