महाराष्ट्र की गुजरात? 'टेस्ला'चा कारखाना कुठे सुरु करणार? केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले, 'आपण..'

Tesla Plant In India: पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या फरकाने पुन्हा सत्तेत येतील याबद्दल टेस्लासारख्या कंपन्यांना विश्वास असल्याने त्यांना भारतीय बाजारापेठेत उतरण्याची इच्छा असल्याचं केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 16, 2024, 01:24 PM IST
महाराष्ट्र की गुजरात? 'टेस्ला'चा कारखाना कुठे सुरु करणार? केंद्रीय मंत्री गोयल म्हणाले, 'आपण..' title=
गोयल यांना मुलाखतीत विचारण्यात आला प्रश्न

Tesla Plant In India: केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी टेस्लाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एलॉन मस्क यांचा उल्लेख करत भारतामधील इलेक्ट्रॉनिक वाहन उद्योगासंदर्भात भाष्य केलं आहे. इलेक्ट्रॉनिक वाहन निर्मितीचं जागतिक केंद्र बनण्याची क्षमता भारतामध्ये असून आपल्या देशासंदर्भात मस्क यांच्या काही विशेष योजना असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे. इलेक्ट्रीक वाहननिर्मिती क्षेत्रातील स्पर्धात्मक किंमत तसेच भारतात असणारं मनुष्यबळ यासारख्या सकारात्मक बाबी फायद्याच्या ठरतील असं मस्क यांना वाटत आहे. केवळ निर्मितीचं केंद्र नाही तर भारतातील सर्व सुविधा पाहता जागतिक स्तरावरील वितरक म्हणून भारताचा विचार करता येईल असं मस्क असल्याची माहिती गोयल यांनी 'इंडिया टुडे'शी बोलताना दिली.

गोयल यांनी दिलं चीनचं उदाहरण

गोयल यांनी यावेळी चीनमध्ये टेस्ला कशी यशस्वी ठरली याबद्दलही भाष्य केलं. चीनमधील इलेक्ट्रीक वाहनक्रांतीमध्ये टेस्लाने कशाप्रकारे हातभार लावला याचा संदर्भ गोयल यांनी दिला. टेस्लाने चीनमधील स्थानिक कंपन्यांमध्येबरोबर भागीदारीच्या माध्यमातून हे उद्दीष्ट साध्य केल्याचं गोयल यांनी आवर्जून नमूद केलं. चीनमध्ये टेस्लाने पाऊल ठेवल्यानंतर तिथे मोठ्याप्रमाणात इलेक्ट्रीक वाहनांना स्वीकारलं गेलं, असंही गोयल म्हणाले.

मोदी पुन्हा सत्तेत येतील असा कंपन्यांनाही विश्वास

टेस्ला सारख्या कंपन्यांना भारतामध्ये फार रस असल्याचं गोयल यांनी सांगितलं. पंतप्रधान नरेंद्र मोदी मोठ्या फरकाने पुन्हा सत्तेत येतील याबद्दल टेस्लासारख्या कंपन्यांना विश्वास असल्याने त्यांना भारतीय बाजारापेठेत उतरण्याची इच्छा असल्याचं गोयल म्हणाले. भारत हा इलेक्ट्रीक मोबॅलिटीमध्ये नवीन आघाडीचा देश म्हणून पुढे येत असून संपूर्ण जग याची दखल घेत असल्याचं गोयल म्हणाले.

नक्की वाचा >> निवडणुकीत पैशांचा पाऊस! पहिल्या टप्प्याआधीच 4658 कोटी जप्त; रोज 100 कोटींची जप्ती

कारखाना कुठे उभारणार महाराष्ट्र की गुजरात

टेस्ला कंपनी भारतात आली तर कंपनीचा कारखाना कोणत्या राज्यात उभारला जाईल यासंदर्भात गोयल यांना प्रश्न विचारण्यात आला. हा प्रश्न विचारताना महाराष्ट्र की गुजरात असे पर्याय देम्यात आले होते. "टेस्लाचा निर्मिती कारखाना महाराष्ट्रात उघडला जाईल की गुजरातमध्ये?" असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर गोयल यांनी, "आपण भारतात राहतो, आपण भारताबद्दल बोलूयात," असं उत्तर दिलं. 

मस्क पुढील आठवड्यात भारत दौऱ्यावर

एलॉन मस्क यांनी आपण 21 आणि 22 एप्रिल रोजी भारताच्या दौऱ्यावर येणार असल्याचं जाहीर केलं आहे. या भेटीदरम्यान मस्क पंतप्रधान मोदींना भेटणार आहेत. या भेटीदरम्यान मस्क मोठी घोषणा करणार असल्याचं सांगितलं जात आहे. मस्क स्टारलिंक सेवा लॉन्च करणार आहे. या माध्यमातून मस्क कंपनी 2 ते 3 बिलियन अमेरिकी डॉलरची गुंतवणूक करणार आहेत.