LokSabha: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली यादी जाहीर, 8 उमेदवारांची घोषणा, वाचा पूर्ण यादी

LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 8 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत.  

शिवराज यादव | Updated: Mar 28, 2024, 07:40 PM IST
LokSabha: एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली यादी जाहीर, 8 उमेदवारांची घोषणा, वाचा पूर्ण यादी title=

LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत 8 उमेदवारांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. यामध्ये दक्षिण मध्य मुंबई, कोल्हापूर, शिर्डी, बुलढाणा, हिंगोली, रामटेक, हातकणंगले आणि मावळ या मतदारसंघाचा समावेश आहे. महायुतीमध्ये अद्यापही काही मतदारसंघावरुन धुसफूस सुरु असताना शिंदे गटाकडून ही पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत ज्या जागांवरुन वाद आहे त्यांचा समावेश टाळला आहे. 

शिंदे गटाने दक्षिण मध्यमधून राहुल शेवाळे, कोल्हापुरातून संजय मंडलिक, शिर्डीमधून सदाशिव लोखंडे, बुलढाणामधून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, रामटेकमधून राजू पारवे, हातकणंगलेमधून धैर्यशील माने आणि मावळमधून श्रीरंग आप्पा बारणे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. 

विशेष म्हणजे पहिल्या यादीत कल्याण-डोंबिवली मतदारसंघाचा समावेश कऱण्यात आलेला नाही. कल्याणमधून एकनाथ शिंदे यांचे सुपूत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देणं जवळपास निश्चित आहे. पण पहिल्या यादीत त्यांच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

दक्षिण मुंबईत ठाकरे गटाने अनिल देसाई यांना उमेदवारी जाहीर केली असल्याने राहुल शेवाळेंची त्यांच्याशी लढत होणार असल्याचं निश्चित झालं आहे. तसंच शिर्डीत ठाकरे गटाचे भाऊसाहेब वाकचौरे आणि शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे आमने-सामने असतील. बुलढाण्यात ठाकरे गटाचे नरेंद्र खेडेकर आणि शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांच्यात लढत  होईल. हिंगोलीत नागेश पाटील-आष्टीकर आणि शिंदे गटाचे हेमंत पाटील एकमेकांना आव्हान देतील. याशिवाय मावळमध्ये ठाकरे गटाचे संजोग वाघेरे आणि शिंदे गटाचे श्रीरंग बारणे एकमेकांविरोधात लढतील. 

 

उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे - 

दक्षिण मध्य - राहुल शेवाळे
 कोल्हापूर - संजय मंडलिक
 शिर्डी - सदाशिव लोखंडे
 बुलढाणा - प्रतापराव जाधव
 हिंगोली - हेमंत पाटील
रामटेक - राजू पारवे
हातकणंगले - धैर्यशील माने 
मावळ - श्रीरंग आप्पा बारणे

गोविंदाचा शिवसेनेत प्रवेश

अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे. गोविंदा स्टार प्रचारक म्हणून काम करणार असल्याची माहिती एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्याला मुंबईतील उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं जाणार असल्याचंही बोललं जात होतं. पण एकनाथ शिंदे यांनी हे वृत्त चुकीचं असल्याचं सांगत नकार दिला. 

गोविंदाने  यावेळी मी निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील असं स्पष्ट केलं. तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी गोविंदाने तिकीट मागितलं नसून, फक्त स्टार प्रचारक म्हणून काम करणार असल्याची माहिती दिली. "मी 2019 ला राजकारणातून बाहेर पडल्यावर वाटलं नव्हतं पुन्हा या क्षेत्रात येईन. पण वनवासानंतर मी पुन्हा रामराज्य असलेल्या पक्षात येत आहे. मी दिलेली जबादारी इमानदारीने पार पाडीन," असं गोविंदा म्हणाला. "आता मुंबई  फार सुंदर दिसत आहे. मुंबईत शिंदे साहेबांमुळे बदल दिसतोय," असं कौतुकही त्याने केलं.