बारामती हादरली! महावितरणाच्या ऑफिसमध्ये घुसून ग्राहकाकडून कर्मचाऱ्याची हत्या; कारण ठरलं लाईट बिल

Women Worker Killed Over Electricity Bill: 10 दिवसांच्या रजेनंतर त्या कामावर रुजू झाल्या होत्या. मागील 10 वर्षांपासून त्या महावितरणमध्ये टेक्निकल विभागामध्ये कार्यरत होत्या. हा हल्ला झाला तेव्हा ऑफिसमध्ये त्या एकट्याच होत्या.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 25, 2024, 10:09 AM IST
बारामती हादरली! महावितरणाच्या ऑफिसमध्ये घुसून ग्राहकाकडून कर्मचाऱ्याची हत्या; कारण ठरलं लाईट बिल title=
बुधवारी घडला हा धक्कादायक प्रकार

Women Worker Killed Over Electricity Bill: बारामतीमध्ये सरकारी महिला कर्मचाऱ्याच्या हत्येचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. घरातील लाईटचं बिल जास्त आल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या ग्राहकाने महावितरण कार्यालयातील महिला कर्मचाऱ्याची हत्या केली. मोरगाव येथील महावितरण कार्यालयामधील या महिला कर्मचाऱ्यावर ग्राहकाने कोयत्याने 16 वार केले. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या 34 वर्षीय रिंकू बनसोडे नावाच्या माहिला कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला. या प्रकरणातील हल्लेखोर अभिजीत पोटे याला पोलिसांनी अटक केली आहे.

एकट्या असतानाच हल्लेखोर ऑफिसमध्ये आला अन्...

रिंकू या मूळच्या लातूरच्या रहिवाशी असून मगील 10 वर्षांपासून त्या महावितरणमध्ये टेक्निकल डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होत्या. 10 दिवसांच्या सुट्टीनंतर रिंकू या बुधवारीच कामावर रुजू झाल्या होत्या. त्या कार्यालयामध्ये एकट्याच असताना सकाळी सव्वा अकरावाजताच्या सुमारास आरोपी पोटे तावातावाने महावितरणाच्या ऑफिसमध्ये आला. त्याने रिंकू यांना अधिक लाईट बील आल्याबद्दल जाब विचारला. रिंकू पोटेची समज घालत असतानाच अचानक त्याने रिंकू यांच्या हात, पाय आणि तोंडावर कोयत्याने वार केले. रिंकू यांना काही कळण्याआधीच पोटेने त्यांच्यावर 16 वार केले.

उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल केलं; उपचारादरम्यान मृत्यू

इतर कर्मचारी ऑफिसमध्ये आले तेव्हा त्यांना रिंकू रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचं दिसून आलं. त्यांच्यावर मोरगाव येथील प्रथमोपचार करुन त्यांना पुण्यातील खासगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. मात्र उपाचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. रिंकू यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यात त्यांना प्राण गमवावा लागल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेचा विषय ठरत असून सर्वच स्तरातून या हल्ल्याच्या निषेध करण्यात आला आहे.

570 रुपये बिलासाठी थेट हत्या

हल्ला करणाऱ्या अभिजित पोटेच्या घरातील विजेचा मीटर रत्नाबाई सोपान पोटे या नावाने आहे. पोटे कुटुंबियांनी एप्रिल महिन्यामध्ये 63 युनिट वीज वापरली. त्यासाठी त्यांना 570 रुपये बिल आलं होतं. गेल्या 12 महिन्यामध्ये पोटे कुटुंबियाकडून सरासरी 40 ते 70 युनिट वीज वापरली जाते. नव्या वीज दरानुसारच हे बिल पाठवण्यात आलं होतं. उन्हाळ्यामुळे उकाडा वाढल्याने सर्वसामान्यपणे ज्याप्रकारे वीज ग्राहकांचा विजेचा वापर वाढतो तसाच प्रकार पोटे कुटुंबाबरोबर घडला. पोटे कुटुंबाचा वीज वापर 30 युनिटने वाढल्याचं वीज बिलाच्या आकडेवारीवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळेच त्यांना आलेलं बिल हे सरासरीपेक्षा अधिक वाटलं. तसेच यासंदर्भात पोटे कुटुंबाकडून कोणत्याही प्रकारची तक्रार नोंदवण्यात आलेली नव्हती, असं महावितरणाने पोलिसांना दिलेल्या माहितीत स्पष्ट केलं आहे.