सलमानच्या घरावर पाच राऊंड फायर, गोळी कोणी चालवली? मुंबई पोलिसांनी सांगितला संपूर्ण वृतांत्त

Firing at Salman Khans Home: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर झालेल्या गोळीबार प्रकरणात एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे. 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 16, 2024, 01:53 PM IST
सलमानच्या घरावर पाच राऊंड फायर, गोळी कोणी चालवली? मुंबई पोलिसांनी सांगितला संपूर्ण वृतांत्त title=
mumbai police press conference over Salman Khan's house firing incident

Firing at Salman Khans Home: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या घरावर रविवारी पहाटे गोळीबार करण्यात आला. गोळीबार करण्यात आलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले आहे. मंगळवारी त्यांना गुजरातच्या भूज येथून ताब्यात घेऊन मुंबईत आणण्यात आलं आहे. आरोपींना 10 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी पत्रकार परिषद घेत गोळीबारा प्रकरणाची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. 

सलमान खान गोळीबार प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला आहे. आरोपींना ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आरोपींबाबत मोठा खुलासा केला आहे. सलमान खानच्या घरावर आरोपींनी पाच राउंड फायर केले. त्यातील चार राउंड घरावरील भिंतींना लागले तर एक राउंड घरात गेला. त्याचवेळी संध्याकाळी अनमोल बिश्नोईने सोशल मीडियावर पोस्ट करत हल्ल्याची जबाबदारी घेतली. त्या पोस्टमधून एकप्रकारे धमकी देण्यात आल्याचे स्पष्ट होतंय, असं पोलिसांनी म्हटलं. 

गोळीबार प्रकरणातील तपासासाठी क्राईम ब्रँचची १२ पथके तयार करण्यात आली होती. ह्यूमन आणि टेक्निकल इंटेलिजन्सची मदत घेण्यात आली. तेव्हा हे आरोपी भूजच्या आसपास असू शकतात त्याआधारे दोन पथके भूजकडे रवाना केली. भुजचे एसपी यांच्याशी चर्चा करुन त्यांची मदत घेतली. त्यानंतर भूजच्या आसपासच्या परिसरातून दोघांना ताब्यात घेण्यात आले. 

आरोपींनी तीन वेळा घराची रेकी केल्याचे तपासात समोर आले आहे. विकी गुप्ता आणि सागर पाल अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. सागर पाल हा हरियाणा येथे कामाला होता. तेथूनच तो बिश्नोई गँगच्या संपर्कात आला. सलमान खानच्या घरावर गोळीदेखील सागर पाल यानेच चालवली होती, अशी माहिती तपासात समोर आली आहे.