भिवंडीत समाजवादीला धक्का! आमदार रईस शेख यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्ते आक्रमक

MLA Rais Shaikh Resign: रईस शेख यांनी राजीनामा दिल्याची बातमी भिवंडी शहरात सोशल मीडियाच्या माध्यमातून पसरली. 

Updated: Apr 20, 2024, 04:53 PM IST
भिवंडीत समाजवादीला धक्का! आमदार रईस शेख यांच्या राजीनाम्यानंतर कार्यकर्ते आक्रमक title=
MLA Rais Shaikh Resign

MLA Rais Shaikh Resign: सध्या लोकसभा निवडणुकीचे राजकारण तापलेला असतानाच भिवंडी पूर्व विधानसभेचे समाजवादी पक्षाचे आमदार रईस कासम शेख यांनी पक्षांतर्गत कुरघोडीच्या राजकारणाला कंटाळून आपल्या आमदार पदाचा राजीनामा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अबू आसिम आजमी यांच्याकडे सुपूर्द केला आहे.

रईस शेख यांनी राजीनामा दिल्याची बातमी भिवंडी शहरात समाज माध्यमातून समाजवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये पसरली. शनिवारी सकाळी त्यांच्या कार्यालय असलेल्या ठिकाणी शेकडो महिला एकत्रित झाल्या. विशेष म्हणजे रईस कासम शेख यांचे कार्यालयसुद्धा बंद करण्यात आले आहे.

रईस यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी 

भिवंडी शहरात रईस शेख यांनी सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी महिलांसाठी विशेष कार्य केले आहे. त्यामुळे रईस यांच्या समर्थनार्थ आमच्या भावना तीव्र असल्याचे महिला कार्यकर्त्या सांगतात. या महिलांनी कार्यालया बाहेर एकत्रित होऊन एकच घोषणाबाजी केली. 

रास्तारोको आंदोलनाचा इशारा 

आम्ही रईस शेख यांना राजीनामा देऊ देणार नाहीत आणि जर त्यांचा राजीनामा पक्षाने मंजूर केला तर आम्ही भिवंडी शहरात रस्त्यावर उतरून रास्तारोको आंदोलन करू असा इशारा देण्यात आला आहे. उपस्थित महिला पदाधिकारी आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.

रईस शेख यांचे स्पष्टीकरण

शहरातील समाजवादी पक्षातील उत्तर भारतीय मुस्लिम आणि महाराष्ट्रातील मुस्लिम असा एक वेगळाच वाद या निमित्ताने समोर आला आहे.समाजवादी पक्षाचा राज्यात विस्तार करण्यासंदर्भात माझी काही भूमिका आहे. गेले वर्षभर मी त्यासंदर्भातले मुद्दे राज्य नेतृत्वाकडे मांडतो आहे. त्यावर पक्षाकडून कोणतीही कार्यवाही झाली नाही, असे स्पष्टीकरण रईस शेख यांनी दिले. माझी समाजवादी पक्षावरील निष्ठा कायम आहे. पक्षाने मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली आहे.  मी पक्षाचा एक कट्टर कार्यकर्ता आहे आणि सदैव राहीन.  मी आमदार नसलो तरी पक्षाची संघटनात्मक ताकद आणि विस्तार वाढवण्याची माझी बांधिलकी कायम असल्याचे ते म्हणाले. मी उपस्थिती केलेल्या मुद्द्यांच्या पार्श्वभूमीवर मी माझ्या आमदारकीचा राजीनामा समाजवादी पक्षाचे महाराष्ट्र अध्यक्ष अबू आजमी यांच्याकडे दिला आहे. मला आशा आहे की राज्यातील पक्षनेतृत्व पक्षाच्या हिताचा उचित निर्णय घेईल, असे त्यांनी सांगितले.