देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव, पहिल्या टप्प्यात राज्यातील 'या' नेत्यांचं भवितव्य पणाला

Loksabha 2024 : देशातील लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. देशातील 21 राज्यातील 102 जागांवर तर महाराष्ट्रातील पाच जागांवर मतदान सुरु झालं आहे. महाराष्ट्रातील नागपूर, चंद्रपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली या मतदारसंघांमध्ये निवडणूक होतेय. याठिकाणी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, सुधीर मुनगंटीवार, प्रतिभा धानोरकर, विकास ठाकरे, राजू पारवे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय.  

| Apr 19, 2024, 11:06 AM IST
1/7

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला (Voting) सुरूवात झालीय. सकाळपासूनच मतदान करण्यासाठी मतदान केंद्रावर लोकांनी गर्दी केलीय. महाराष्ट्रातील 5 तर देशातील 102 मतदारसंघात मतदानाला सुरूवात झाली असून, नितीन गडकरी, प्रतीभा धानोरकर, विकास ठाकरे, पारवे, प्रशांत पडोळे, सुनील मेंढे, नाना पटोले, अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांनी मतदानाचा हक्क बजावलाय. 

2/7

.देशात 21 राज्यातील 102 जागांसाठी निवडणूक होतेय. भाजपप्रणित एनडीए विरुद्ध काँग्रेसप्रणित इंडिया आघाडी असा हा थेट सामना असणाराय. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या प्रचारसभांमुळं यंदाची निवडणूक गाजली..

3/7

रामटेक

अनुसुचित जातींसाठीचा राखीव मतदारसंघ अशी ओळख असणाऱ्या रामटेकमध्ये काँग्रेस, शिवसेना आणि वंचितचे पाठिंबा असलेले अपक्ष यांच्यात तिरंगी लढत आहे. इथं वंचितनं माघार घेतली असून, अपक्ष उमेदवार किशोर गजभिये  यांना पाठिंबा दिला आहे. तर, श्याम बर्वे विरुद्ध राजु पारवे विरुद्ध किशोर गजभिये असा सामना इथं रंगणार आहे.   रामटेकमध्ये गजभिये यांच्या उमेदवारीने काँग्रेसची डोकेदुखी वाढणार? ओबीसी आणि दलित मतदार मतदारांची भूमिका निर्णयाक ठरणार ? या प्रश्नांची उत्तरं मतदार आपल्या भूमिकांतून आणि मतांच्या रुपातून मांडणार आहेत.   

4/7

नागपूर

नागपूर मतदारसंघात भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे यांच्यामध्ये मुख्य लढत होईल. या मतदारसंघात वंचितने उमेदवार न देता काँग्रेसचे विकास ठाकरे यांना पाठिंबा दिला आहे. तर, इथं बसपाचा उमेदवारही रिंगणात असून आता हत्तीची चाल कोणाला महागात पडाणार? नागपूरच्या विकासाचा गडकरींचा मुद्दा कितपत चालणार? काँग्रेसचे सर्व गटतट शेवटपर्य़ंत एकत्र राहणार का? या प्रश्नांची उत्तरं काही दिवसांतच मिळणार आहेत

5/7

भंडारा – गोंदिया

भाजपकडून सुनिल मेंढे या विद्यमान खासदारांना भंडारा – गोंदिया मतदारसंघात पुन्हा संधी देण्यात आली असून, काँग्रेसकडून यावेळी डॉ. प्रशांत पडोळे रिंगणात आहेत. इथं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तब्बल 25 वर्षानंतर मतदारसंघात हाताचे चिन्ह पाहायला मिळत असून, इथं बसपाकडून संजय कुंभलकर निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. शेतीच्या पाण्याचा प्रश्न अनेक दिवसांपासून प्रलंबित असून, तांदळाचं पिक मोठ्या प्रमाणात होणाऱ्या या मतदारसंघात तांदळाचा मोठा उद्योग उभा राहिला नसल्यामुळं मतदार कोणाला कौल देतात हे पाहणं महत्त्वाचं असेल. 

6/7

गडचिरोली

अनुसुचित जमातींसाठीचा राखीव मतदारसंघ अशी ओळख असणारा आणि घनदाट जंगल, दुर्गम भाग असलेला मतदारसंघ म्हणजे गडचिरोली. विकासापासून कैक मैल दूर असणारा हा नक्षलग्रस्त भाग, आता भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते राखतात की, काँग्रेसकडून नामदेव किरसान बाजी मारतात हे पाहणं महत्त्वाचं असेल.   

7/7

चंद्रपूर

वनमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपूर मतदारसंघात भाजपकडून रिंगणात असून, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांची प्रतिष्ठा इथं पणाला लागली आहे. कुणबी विरुद्ध इतर ओबीसी असा सामना या मतदारसंघात रंगण्याची शक्यता असून, खनिज, उर्जा प्रकल्प, कोळसा खाणींमुळे चंद्रपूरमध्ये प्रदूषणाचा प्रश्न गंभीर उभा राहिला आहे. तेव्हा या प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी कोणत्या उमेदवाराकडे मतदारांचा कल असेल हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.