IPL 2024: आऊट झाल्यानंतर वाद घालणाऱ्या विराटला अम्पायरने मैदानाबाहेर रोखलं; पुढे काय झालं पाहा

IPL 2024: कोलकाताविरोधातील (Kolkata Knight Riders) सामन्यात विराट कोहलीच्या (Virat Kohli) विकेटवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. नो बॉल असतानाही विकेट दिल्याचा आक्षेप घेत विराट कोहलीने मैदानात पंचांशी वाद घातला.   

शिवराज यादव | Updated: Apr 22, 2024, 03:03 PM IST
IPL 2024: आऊट झाल्यानंतर वाद घालणाऱ्या विराटला अम्पायरने मैदानाबाहेर रोखलं; पुढे काय झालं पाहा title=

IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bengaluru) संघाला आणखी एका पराभवाचा सामना करावा लागला आहे. रविवारी झालेल्या सामन्यात कोलकाताने (Kolkata Knight Riders) फक्त एका धावेने बंगळुरुचा पराभव केला. अगदी शेवटच्या चेंडूपर्यंत या सामन्याचा थरार रंगला होता. कोलकाताने आधी फलंदाजी करत 226 धावांचा डोंगर उभा केल्यानंतर बंगळुरुचे फलंदाजही त्याच आक्रमकतेने उत्तर देण्यासाठी मैदानात उतरले होते. पण हर्षित राणाने विराट कोहलीची विकेट घेत मोठं यश मिळवून दिलं. पण विराटने चेंडू कमरेच्या वर असल्याचं सांगत नो बॉलसाठी रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूनंतरही विराट कोहलीला आऊट देण्यात आलं. 

यानंतर मैदान सोडण्यापूर्वी विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसला. त्याने आपला हा आक्षेप, संताप मैदानातील पंचांकडे नोंदवला आणि नंतर मैदान सोडलं. मैदानाबाहेर गेल्यानंतर त्याने कचऱ्याच्या पेटीवर आपला राग काढला. पण त्याच्याकडे दुसऱा कोणताच पर्याय नव्हता. 

सामन्यात पराभव झाल्यानंतर विराट कोहली ड्रेसिंग रुमकडे परतत होता. यावेळी एका अम्पायरने त्याला रोखलं आणि त्याला आऊट का दिलं यामागील कारण सांगण्याचा प्रयत्न केला. पण यावेळीही विराट कोहली काही ऐकण्याचा मनस्थितीत नव्हता. त्यानेही आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न करत अम्पायरला चूक दाखवण्याचा प्रयत्न केला. तो खाली वाकून नेमकं काय झालं ते सांगण्याचा प्रयत्न करत होता. 

दरम्यान रविवारी झालेल्या सामन्याबद्दल बोलायचं गेल्यास कोलकाताने बंगळुरुसमोर 222 धावांचा डोंगर उभा केला होता. बंगळुरु संघाने आव्हानाचा पाठलाग करताना कडवी झुंज दिली. पण अखेरच्या क्षणी एका धावेमुळे त्यांनी सामना गमावला. 

बंगळुरुचा कर्णधार फाफ डू प्लेसिसने सामन्यानंतर विराट कोहलीच्या विकेटवर बोलताना म्हटलं की, "हे फारच अनाकलनीय आहे. नियम हे नियम असतात. मला आणि विराटला चेंडू कमरेच्या वर असल्याचं वाटत होतं. एका संघाला तो जास्त वर असल्याचं वाटतं आणि दुसऱ्याला नाही. खेळात अशाच गोष्टी होत असतात".

"सुनील नरीनने टाकलेली ओव्हर सामन्याचं चित्र बदलणारी ठरली. छोट्या गोष्टींनी फार फरक पडतो. पण मला खेळाडूंचा अभिमान वाटत आहे. आज त्यांनी गोलंदाजी, क्षेत्ररक्षण यात चांगली कामगिरी केली. आम्ही अखेरीस काही जास्त धावा दिल्या. पण आम्ही त्यांना मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखलं. आम्ही पॉवरप्लेमध्ये फटकेबाजी करण्याचं ठरवलं होतं," असं त्याने सांगितलं.

"आम्ही हताश होतो. पण आम्ही पूर्ण प्रयत्न केले. आमच्याकडे अविश्वसनीय चाहतावर्ग आहे, आम्हाला त्यांना आनंदी करायचं आहे, आम्हाला ते हवे आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर एक स्मितहास्य आहे," अशी भावना त्याने व्यक्त केली.