सुनील नारायणने का ब्लॉक करून ठेवलेत खेळाडूंचे मोबाईल नंबर? वेस्ट इंडिज कॅप्टनचा धक्कादायक खुलासा

Rovman Powell on Sunil Narine : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या सुनील नारायणला पुन्हा टी-ट्वेंटी वर्ल्ड कपमध्ये खेळवण्यासाठी वेस्ट इंडिज क्रिकेटचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच आता कॅप्टन रोमन पॉवेलने मोठा खुलासा केलाय.

सौरभ तळेकर | Updated: Apr 17, 2024, 06:32 PM IST
सुनील नारायणने का ब्लॉक करून ठेवलेत खेळाडूंचे मोबाईल नंबर? वेस्ट इंडिज कॅप्टनचा धक्कादायक खुलासा title=
Rovman Powell on Sunil Narine

Sunil Narine In T20 WC : कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर फलंदाज सुनील नारायण (Sunil Narine) याने राजस्थानच्या गोलंदाजांना पळू पळू मारलं. 13 फोर अन् 6 सिक्सच्या मदतीने सुनील नारायणने राजस्थानच्या गोलंदाजांना पाणी पाजलं. नारायणच्या रडारवर होते राजस्थानचे स्पिनर्स... आर आश्विन असो वा युझी चहल... नारायणने दोघांनाही सुट्टी दिली नाही अन् दोघांना मिळून चांगलाच चोप दिला. सुनील नारायणने 56 बॉलमध्ये 109 धावांची खेळी केली. नारायणने फक्त फलंदाजीच नाही तर गोलंदाजीमध्ये देखील कोलकाताला आघाडी मिळवून दिली होती. बाकीच्या गोलंदाजांना चोप मिळत असताना सुनीलने 4 ओव्हरमध्ये फक्त 30 धावा देत 2 विकेट्स नावावर केल्या अन् वेस्ट इंडिजचा कॅप्टन रोमन पॉवेल (Rovman Powell) याची विकेट काढली अन् कोलकाताला सामन्यात पुन्हा आणलं होतं. कालचा दिवस जरी सुनील नारायणचा असला तरी बटलरने मेहनतीच्या जोरावर सामना खेचला. सामना झाल्यावर अनेकांनी सुनीलचं कौतूक केलं. मात्र, रोमन पॉवेलने यावेळी धक्कादायक खुलासा केला.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतलेल्या सुनील नारायणला पुन्हा वेस्ट इंडिज टीमधून खेळवण्यासाठी आम्ही इच्छूक असल्याचं वेस्ट इंडिजचा कॅप्टन रोमन पॉवेल याने म्हटलं आहे. मात्र, सुनीलने आमच्या सर्वांचे मोबाईल नंबर ब्लॉक केले आहेत, असंही त्याने सांगितलं. ज्यांनी ज्यांनी नारायणला फोन केले, त्यांना सर्वांना त्याने ब्लॉक करून ठेवलंय, असा खुलासा देखील पॉवेल याने केला आहे. जगातील टी-ट्वेंटी लीगवर लक्ष केंद्रीत करण्यासाठी सुनील नारायणने मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून संन्यास घेतला होता. सुनील ऑगस्ट 2019 मध्ये वेस्ट इंडिजसाठी अखेरचा टी-20 सामना खेळला होता.

काय म्हणाला वेस्ट इंडिज कॅप्टन?

मी गेल्या 12 महिन्यापासून त्याच्या डोक्यात ही गोष्ट घालण्याचा प्रयत्न करतोय. मात्र, त्याने मनावर काही घेतलं नाहीये. त्याने त्या सर्व खेळाडूंनी ब्लॉक केलंय, ज्यांनी त्याला वेस्ट इंडिजसाठी टी-ट्वेंटी वर्ल्ड कप खेळण्याचा प्रयत्न केलाय. ज्यामुळे कायरन पोलार्ड. ड्वेन ब्रावो आणि निकोलस पुरन देखील आहे, असं रोमन पॉवेलने म्हटलं आहे. तर मला आशा आहे की, सर्वजण मिळून त्याचं मन वळवून घेऊ, असा विश्वास देखील पॉवेलने व्यक्त केला आहे.

दरम्यान, सुनीलने या हंगामात नाइट रायडर्ससाठी अव्वल स्थानावर चांगली कामगिरी केली आहे. तो माझा वेस्ट इंडिजचा सहकारी आहे आणि आशा करतो की तो चांगली कामगिरी करत राहील, असंही पॉवेलने म्हटलं आहे.