'बोरिवलीच्या रस्त्यावरचं इंग्लिश...,' भारताच्या दिग्गज खेळाडूने रोहित शर्माबद्दल केलं विधान, 'पहिल्यांदा भेटलो तेव्हा...'

भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आगामी वर्ल्डकपमध्ये टी-20 संघाचं प्रतिनिधित्व करणार आहे. बोरिवली येथून भारतीय क्रिकेट संघाच्या नेतृत्वापर्यंतचा त्याचा प्रवास फारच रंजक आहे.   

शिवराज यादव | Updated: May 8, 2024, 01:05 PM IST
'बोरिवलीच्या रस्त्यावरचं इंग्लिश...,' भारताच्या दिग्गज खेळाडूने रोहित शर्माबद्दल केलं विधान, 'पहिल्यांदा भेटलो तेव्हा...' title=

भारतीय क्रिकेट संघाच्या महान खेळाडूंमध्ये युवराज सिंग आणि रोहित शर्मा यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. दोघेही क्रिकेटर भारताच्या 2007 मधील भारतीय टी-20 संघाचा भाग होते. युवराज सिंग त्यावेळी आपल्या करिअरमधील सर्वोत्तम फॉर्ममध्ये होता. तर दुसरीकडे रोहित शर्माने नुकतीच आपल्या करिअरला सुरुवात केली होती. पण नंतर दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली होती. युवराज ज्येष्ठ खेळाडू असल्याने रोहित शर्मा नेहमीच त्याचा आदर करत असे. रोहित शर्माने कपिल शर्मा शोमध्ये एक किस्साही सांगितला होता. 

"जेव्हा मी भारतीय संघात पदार्पण केलं होतं, तेव्हा टीम बसमध्ये जाऊन दुर्देवाने युवराज सिंगच्या सीटवर बसलो होतो. पण नंतर ही मोठी समस्या झाली. बसमध्ये खेळाडूंसाठी जागा ठरलेली असते. प्रत्येकजण आपल्या आवडत्या सीटवर बसणं पसंत करतो. युवराज सिंग बसमध्ये चढल्यानंतर आपल्या स्वभावाप्रमाणे डोळ्यांनी संपर्क साधून उठण्यास सांगितलं. आर पी सिंग माझ्या मागच्या सीटवर बसला होता. त्याने मला ही युवराज सिंगची सीट असल्याचं समजावलं. मला वाटलं मी सीटवर लिहिलेलं नाव वाचलं नाही," असा किस्सा रोहित शर्माने सांगितला. युवराज सिंगला लोकांना घाबरवायला आवडतं असं रोहितने सांगताच एकच हशा पिकला होता. 

रोहित शर्माने 2007 मध्ये भारतीय संघात पदार्पण केल्यापासून युवराज सिंग त्याच्या प्रवासाचा साक्षीदार आहे. युवराज सिंगने रोहित शर्माची आपल्यावर पहिली छाप सांगताना, त्याने फारच खराब इंग्रजी असं उपहासात्मकपणे म्हटलं. "फारच गंमतशीर माणूस. बोरिवलीच्या रस्त्यावरुन असं आम्ही त्याला नेहमी चिडवायचो. पण तो मनाने चांगला माणूस आहे," असं युवराज सिंगने सांगितलं.

युवराजने आयपीएलमधील शेवटचा सामना मुंबई इंडियन्सकडून रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळला होता. "त्याला इतकं यश मिळालेलं असतानाही तो व्यक्ती म्हणून अजिबात बदललेला नाही. हेच रोहित शर्माचं वैशिष्ट्य आहे. त्याला मस्करी करणं आवडतं. सर्वांसह मस्करी करत असतो. तो एक उत्कृष्ट कर्णधार असून, क्रिकेटमधील माझ्या चांगल्या मित्रांपैकी आहे," असं युवराजने म्हटलं आहे. मला रोहित शर्माला वर्ल्डकप ट्रॉफी आणि मेडलसह पाहायचं आहे. तो यास पात्र आहे अशी भावनाही त्याने व्यक्त केली आहे. 

युवराज सिंगने आपल्या जवळच्या मित्राला पुढील महिन्यात होणाऱ्या टी-20 वर्ल्डकप ट्रॉफीसह पाहायचं असल्याचं सांगितलं आहे. एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ अंतिम सामन्यापर्यंत पोहोचला होता. पण ऑस्ट्रेलियाने पराभव करत भारतीय संघाचा स्वप्नभंग केला. आता 2 जूनपासून टी-20 वर्ल्डकपला सुरुवात होणार असून, रोहित शर्माच्या खांद्यावर नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. 

"रोहित शर्माची उपस्थिती फार महत्त्वाची ठरणार आहे. मला वाटतं तो फार चांगला कर्णधार आहे. कितीही दबाव असला तरी तो योग्य निर्णय घेतो," असं युवराज म्हणाला आहे. युवराज सिंगला टी-20 वर्ल्डकपचा ब्रँड अॅम्बेसिडर म्हणून निवडण्यात आलं आहे.