रोज 5 लाख किंमतीच्या सोन्याची राख ओकतोय पृथ्वीवरील 'हा' ज्वालामुखी; NASA ची माहिती

Rs 5 Lakh Gold Ejectes Per Day: सध्या सोन्याच्या दराची जोरदार चर्चा आहे. एक तोळा सोन्याचा दर लवकरच 75 हजारांचा टप्पाही ओलांडेल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. असं असतानाच अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेनं पृथ्वीवरील एका भन्नाट जागेसंदर्भातील माहिती जाहीर केली आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 19, 2024, 01:37 PM IST
रोज 5 लाख किंमतीच्या सोन्याची राख ओकतोय पृथ्वीवरील 'हा' ज्वालामुखी; NASA ची माहिती title=
रोज या ज्वालामुखीतून बाहेर पडतं सोनं (प्रातिनिधिक फोटो सौजन्य - रॉयटर्स)

Rs 5 Lakh Gold Ejectes Per Day: पृथ्वीवर एक असा ज्वालामुखी आहे ज्यामधून चक्क खऱ्याखुऱ्या सोन्याचा पाऊस पडतो असं सांगितलं तर तुमचा कदाचित यावर विश्वास बसणार नाही. पण खरोखरच इरेबस डोंगरातील एका ज्वालामुखीतून रोज लाखो रुपयांचं सोनं बाहेर फेकलं जात आहे. हा सक्रीय ज्वालामुखी अंटार्टिका खंडात आहे. अर्थात या ज्वालामुखीमधून इतरही अनेक पदार्थ बाहेर फेकले जातात. अमेरिकेतील अंतराळ संस्था असलेल्या 'नासा'च्या अर्थ ऑबझर्व्हेटरीने हा खुलासा केला आहे. 

रोज 5 लाखांचं सोनं बाहेर पडतं

या डोंगरातील ज्वालामुखीमधून जवळपास रोज 6 हजार अमेरिकी डॉलर्स म्हणजेच 5 लाख 1 हजार रुपयांहून अधिक किंमतीचं सोनं बाहेर फेकलं जातं.  आयएफएल सायन्सने दिलेल्या वृत्तानुसार, रोज या ज्वालामुखीमधून 80 ग्राम सोनं बाहेर फेकलं जातं. मात्र हे सारं वाचून या डोंगराजवळ जाऊन बाहेर पडणारं हे सोनं गोळा करण्याचा तुमचा विचार असेल तर ते शक्य नाही. यामागील मुख्य कारण म्हणजे या ठिकाणी पोहोचणं अजिबात शक्य नाही. हा डोंगर अटार्टिकामधील फारच दुर्गम भागात आहे.

1 हजार किमीपर्यंत पसरतं हे सोनं

या ज्वालामुखीमधून ठराविक वेळाने बाहेर पडणाऱ्या गॅसच्या फवाऱ्यांबरोबर हे सोन्याचे कण बाहेर फेकले जातात. हे सोनं क्रिस्टल म्हणजेच स्पटिक स्वरुपात आहे. हे सोनं स्पटिक स्वरुपात असल्याने ते ज्वालामुखी असेलल्या डोंगरापासून फार दूर अंतरापर्यंत पसरलं जातं. वैज्ञानिकांनी दिलेल्या माहितीनुसार हे सोनं या ज्वालामुखीपासून अगदी 621 मैल म्हणजेच 1 किलोमीरटपर्यंतच्या परिघामध्ये पसरतं. 

नक्की वाचा >> पृथ्वीजवळ सापडलं भलंमोठं Black Hole; सूर्यापेक्षा 33 पट वजनदार! आकाशगंगेत पहिल्यांदाच..

इथं एकूण 809 ज्वालामुखी

अंटार्टिकामध्ये केवळ इरेबस हा एकमेव सक्रीय ज्वालामुखी नाही. या खंडावर तब्बल 138 सक्रीय ज्वालामुखी आहेत. नुकत्याच करण्यात आलेल्या अभ्यासामध्ये ही आकडेवारी समोर आली होती. इथल्या एकूण ज्वालामुखींसंदर्भात बोलायचं झाल्यास, निष्क्रीय ज्वालामुखींची संख्या गृहित धरल्यास एकूण 809 ज्वालामुखी इथं आहेत. 

या खंडावरील सर्वात उंच डोंगर

इरेबस डोंगर हा अंटार्टीकामधील सर्वात उंचीवरील सक्रीय ज्वालामुखी आहे. या ज्वालामुखीची उंची 12 हजार 448 फूट इतकी आहे. हा या खंडावरील सर्वात सक्रीय ज्वालामुखी आहे. 1841 साली कॅप्टन सर जेम्स क्लार्क रोज यांनी पहिल्यांदा हा ज्वालामुखी पाहिला जेव्हा त्यामधून लाव्हारस आणि धूर बाहेर पडत होता. 

नक्की वाचा >> रसवंतीगृहांची नावं 'नवनाथ' आणि 'कानिफनाथ'च का असतात? यामागे आहे रंजक कारण

या ज्वालामुखीत पडलेलं विमान; 257 जणांनी गमावलेले प्राण

या ज्वालामुखीमध्ये एका एअर न्यूझीलंडचं एक विमानही पडलं होतं. या अपघातामध्ये 257 प्रवाशांचा मृत्यू झाला होता. बर्फामुळे निर्माण होणाऱ्या दृष्टीछळामुळे म्हणजेच व्हाइटआऊटमुळे हा अपघात झाल्याचा दावा करण्यात आला. हा ज्वालामुखी बर्फाच्छादित असल्याने वैमानिकांना तो दिसला नाही. या दुर्घटनेला माऊंट इरेबस डिझास्टर म्हणून ओळखलं जातं.