1 घर, 5 सदस्य अन्... युट्यूबर जोडप्याने 7 व्या मजल्यावरुन मारली उडी; मृत्यूमागील गूढ कायम

YouTubers couple Jumps From 7th Floor: इमारतीमधील नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता त्यांना दोघांचे मृतदेह इमारतीच्या आवारत आढळून आले.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 14, 2024, 01:51 PM IST
1 घर, 5 सदस्य अन्... युट्यूबर जोडप्याने 7 व्या मजल्यावरुन मारली उडी; मृत्यूमागील गूढ कायम title=
पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवले

YouTubers couple Jumps From 7th Floor: लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या एका जोडप्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना हरियाणामधील बहादूरगड येथे घडली आहे. या दोघांनीही इमारतीच्या सातव्या मजल्यावरुन उडी मारुन आपलं आयुष्य संपवलं. दोघे ज्या इमारतीमध्ये भाडेतत्वाने घेतलेल्या घरात राहत होते त्याच इमारतीच्या गच्चीवरुन उडी मारुन त्यांनी जीव दिला.

कोण आहेत हे दोघे?

एएनआय या वृत्तसंस्थेनं अधिकाऱ्यांच्या हव्याने दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्या तरुणाचं नाव गर्वित असं असून मुलीचं नाव नंदिणी असं आहे. गर्वित हा 25 वर्षांचा होता तर नंदिणी अवघ्या 22 वर्षांची होती. दोघांनीही हरियाणामधील बहादूरगड येथील रुहील रेसीडन्सी इमारतीवरुन उडी मारली. गर्वित आणि नंदिणी हे दोघेही युट्यूबर्स होते. दोघांचं युट्यूबवर एक चॅनेल होतं. या चॅनेलवरुन तो शॉर्ट फिल्मस पोस्ट करायचे. त्यांच्याबरोबर एक छोटी टीमही काम करायची.

काही दिवसांपूर्वीच झालेले शिफ्ट

काही दिवसांपूर्वीच गर्वित आणि नंदिणी हे दोघे त्यांच्या टीमबरोबर हरियाणामध्ये आले होते. हे दोघेही देहरादूनवरुन हरियाणामध्ये आलेले. दोघांनीही रुहील रेसीडन्सी नावाच्या इमारतीच्या सातव्या मजल्यावर एक घर भाडेतत्वावर घेतलं होतं. हे दोघेही त्यांच्या टीममधील 5 सदस्यांबरोबर मागील काही दिवसांपासून या घरातच राहत होते. 

जोरदार भांडण झालं अन्...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गर्वित आणि नंदिणी हे दोघे शुटींग पूर्ण करुन रात्री उशीरा घरी आले. यानंतर या दोघांमध्ये काही कारणावरुन जोरदार भांडण झालं. त्यानंतर या दोघांनी शनिवारी पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास सातव्या मजल्यावरुन खाली उडी मारुन स्वत:ला संपवलं. पोलिसांना इमारतीमधील नागरिकांनी या घटनेची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. 

सर्व शक्यतांचा तपास

पोलिसांनी इमारतीच्या आवारातून गर्वित आणि नंदिणीचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलिसांनी दोघांच्याही नातेवाईकांना त्यांच्या मृत्यूसंदर्भातील महिती दिली आहे. फॉरेन्सिक टीमनेही घटनास्थळाची पहाणी केली आहे. या टीमने अनेक पुरावे गोळा केले आहेत. या इमारतीमधील सीसीटीव्ही फुटेज पोलीस तपासून पाहत आहेत. दोघांमध्ये नेमका कोणत्या कारणावरुन वाद झाला? दोघांचं भांडणं झालं तेव्हा घरात इतर कोणी होतं का? या दोघांवर काही आर्थिक व्यवहारांचा ताण होता का? या सर्वच बाबी पोलीस तपासून पाहत आहेत. गर्वित आणि नंदिणी या दोघांच्या टीममधील सदस्यांचीही चौकशी पोलिसांकडून केली जात आहे. "आम्ही या प्रकरणाचा सर्वच बाजूने तपास करत आहोत. पूर्ण तपास करुन पुढील कारवाई केलीजाईल," असं तपास अधिकारी असलेल्या जगबीर यांनी सांगितल्याची माहिती एएनआयने दिली आहे.