Video : दुरावा फक्त राजकारणापुरता; पार्थ आणि रोहित पवारांना एकत्र पाहून सगळे असं का म्हणतायत?

Loksabha Election 2024 : देवाच्या जत्रेनिमित्त एकत्र दिसली पवार कुटुंबातील पुढची पिढी... सोशल मीडियावर व्हिडीओ तूफान व्हायरल. तुम्ही पाहिला का?   

सायली पाटील | Updated: Apr 24, 2024, 10:14 AM IST
Video : दुरावा फक्त राजकारणापुरता; पार्थ आणि रोहित पवारांना एकत्र पाहून सगळे असं का म्हणतायत?  title=
loksabha elections 2024 ncp parth pawar and rohit pawar comes together in local yatra video viral

Loksabha Election 2024 : राजकीय वर्तुळात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु असतानाच अनेक बडे नेते पक्ष बदलण्याच्या तयारी आहेत, तर काहींनी पक्षांतराचा निर्णयही घेतला आहे. राजकारणातील प्रस्थापितांच्या कुटुंबातही फूट पडल्याचं संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलं आहे. पण, राजकारणातील डावपेचांमध्ये कितीही मतभेद असले तरीही ही कुटुंब या वर्तुळाबाहेर मात्र एकत्रच असल्याचं स्पष्ट होत आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणारा एक व्हिडीओ याचीच प्रचिती देत आहे. 

शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नेतृत्त्वाखाली राजकारणात सक्रिय असणाऱ्या राष्ट्रवादी (NCP) काँग्रेस पक्षात (Ajit Pawar) अजित पवार यांनी बंडखोरी करत मोठ्या नेत्यांसह पक्षातच दुसरा गट स्थापित करत सत्तेत असणाऱ्या भाजपसोबत हातमिळवणी केली. इथं, पवार कुटुंबही विभागलं गेल्याचं सर्वांनीच पाहिलं. 

अजित पवार आणि सुप्रिया सुळे, या बहिण भावाच्या नात्यात दुरावा आला, तर सख्ख्या भावानंही अजित पवार यांच्या राजकीय धोरणांची साथ सोडली. दरम्यान राजकारणामुळे कौटुंबिक दुरावा आला असला तरीही या वर्तुळापलिकडे मात्र या कुटुंबातील नात्यांचे बंध अद्याप तितकेच मजबूत असल्याचं पाहायला मिळत आहे. नुकत्याच पार पडलेल्या हिंजवडीतील म्हतोबा यात्रेत असंच काहीसं दृश्य पाहायला मिळालं. जिथं अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार आणि राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे नेते रोहित पवार एकाच बगाड्यावर दिसले. 

हेसुद्धा वाचा : म्हाडा, सिडकोच्या 'या' निर्णयामुळं अनेकांना मिळणार हक्काचं घर; मूळ दरात किती टक्के सवलत मिळणार? 

 

यात्रेत एकत्र दिसणारे हे दोघंही तिथं देवाच्या बगाड्यावर ही एकत्रचत होते. बगाड्यावर चढताना पार्थ पवारांनी रोहित पवारांना हातही दिला. गर्दी असल्यामुळे दोघंही एकमेकांना आधार देत होते. तिथं उपस्थित असणाऱ्या सर्वांच्याच चेहऱ्यावर यावेळी कमाल आनंद पाहायला मिळाला आणि पक्ष फुटीनंतर दोन्ही भावांची अशी एकत्र भेट चर्चेचा विषय ठरली. 

पार्थ पवारांना वाय प्लस सुरक्षा 

लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीदरम्यानच उपमुख्यमंत्र्यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. महत्त्वाच्या व्यक्तीला किंवा अतिमहत्वाच्या व्यक्तीला Y प्लस सुरक्षा देण्य़ात येते. विशेष लक्ष वेधून घेणाऱ्या व्यक्तीलाही या स्तरातील सुरक्षा दिली जाते. Y प्लस सुरक्षा कवचामध्ये 11 सुरक्षा रक्षकांचा समावेश असतो. त्यात 2 ते 4 शस्त्र किंवा बंदूकधारी सुरक्षा रक्षक, सीआरपीएफ किंवा CISF जवान असतात.