'पंतप्रधान प्रचारात मटण वगैरे..'; 'मुघल मातीचा गुण' अन् 'बीफ'चा संदर्भ देत मोदींवर निशाणा

Thackeray Group React On PM Modi Comment About Mutton Mughal: "मोदींच्या संस्कारी भाजपने ‘बीफ’ म्हणजे गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून शेकडो कोटींचा निधी घेतला, हासुद्धा एकप्रकारे श्रावणातला मांसाहारच आहे," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

स्वप्निल घंगाळे | Updated: Apr 15, 2024, 07:40 AM IST
'पंतप्रधान प्रचारात मटण वगैरे..'; 'मुघल मातीचा गुण' अन् 'बीफ'चा संदर्भ देत मोदींवर निशाणा title=
मोदींवर साधला निशाणा

Thackeray Group React On PM Modi Comment About Mutton Mughal: "कार्यवाहक पंतप्रधान मोदी यांनी निवडणूक प्रचाराचा स्तर भलताच खाली आणला. अर्थात हे भाजपच्या संस्कृतीस धरूनच आहे. राजकारण असो की व्यक्तिगत जीवन, शेवटी संस्कार महत्त्वाचे ठरतात," असा टोला उद्धव ठाकरे गटाने लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी खाद्यपदार्थांसंदर्भातून नुकत्याच एका भाषणात केलेल्या विधानाचा समाचार ठाकरे गटाने घेतला आहे. इंडिया आघाडीवर टीका करताना पंतप्रधानांनी मटणाचा संदर्भ दिल्याच्या मुद्द्यावरुन ठाकरे गटाने पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे.

ब्रिटिश गेले तसे मोदीही जातील

"एकदा नारदमुनी रस्त्यावरून जात असताना त्यांना एक डुक्कर चिखलात लोळत असताना दिसले. नारदमुनींच्या मनात त्याच्याविषयी दयाभाव निर्माण झाला. नारदमुनी थांबले व त्यांनी त्या डुकरास विचारले, “चल माझ्याबरोबर. मी तुला स्वर्गात जागा देतो. सुखाने राहशील.’’ त्यावर त्या डुकराने विचारले, “पण तुमच्या त्या स्वर्गात चिखल आणि गटार आहे काय?’’ यावर नारदमुनी त्या डुकरास कोपरापासून दंडवत घालून पुढे निघाले. शेवटी संस्कार महत्त्वाचा ठरतो तो असा. पंतप्रधान मोदी चारेक दिवसांपूर्वी महाराष्ट्रात होते. तेथे ते म्हणाले, “काँग्रेस हे कारल्यासारखे कडू आहे. त्यास साखरेच्या पाकात घोळा नाहीतर तुपात तळा, ते कडूच राहणार.’’ मोदी यांना गुळाची चव नाही, तशी कारल्याची चव नसावी. कारले हे आयुर्वेदात गुणकारी म्हणून मानले जाते व या ‘कडू कारल्या’मुळेच ब्रिटिशांना भारत सोडून जावे लागले. आता कारल्याचा कडू रस मोदी यांनाही प्यावा लागत असल्याने ते ‘कडू’ शब्दांचा वापर करून प्रचाराचा स्तर खाली आणत आहेत. ब्रिटिश गेले तसे मोदीही जातील," असा टोला ठाकरे गटाने 'सामना'च्या '‘मुघल’ मातीचा गुण! मटण, कारले वगैरे..' मथळ्याखालील अग्रलेखातून लगावला आहे.

मोदी प्रचारसभेतून मटणावर बोलतात

"मोदी आता म्हणतात, इंडिया आघाडीचे लोक मुघल विचारांचे आहेत. हे लोक श्रावणात मटण वगैरे खातात. पंतप्रधान पदावरील व्यक्ती प्रचारात मटण, कारले वगैरे विषय आणत आहे. याचा अर्थ गेल्या दहा वर्षांत मोदी यांच्याकडून काहीच भरीव कार्य घडलेले नाही. एका बाजूला राहुल गांधी हे बेरोजगारांना कामे देण्याची घोषणा करतात. इंडिया आघाडीचे सरकार आल्यास 30 लाख पदे भरू, असे सांगतात. सर्व पदवीधर आणि पदविकाधारकांना शिकाऊ उमेदवारीचा अधिकार दिला जाईल, असे वचन देतात. त्याच वेळी मोदी हे विरोधकांच्या खाण्यापिण्यावर घसरतात. भाजपने भ्रष्टाचाराचा पैसा व सार्वजनिक संपत्तीचा घास गिळलेला चालतो, पण विरोधकांनी कारले खावे की मटण खावे यावर पंतप्रधान महाशय त्यांच्या प्रचार सभांतून बोलत आहेत," असं म्हणत ठाकरे गटाने आपला आक्षेप नोंदवला आहे.

तो गुंड शाकाहारी असल्याने पक्षात प्रवेश दिला का?

"मोदी यांच्या संस्कारी पक्षाचा आणखी एक कारनामा समोर आला आहे. एन्काऊंटर करण्यासाठी पोलीस ज्याचा शोध घेत होते तो कुख्यात गँगस्टर सोनू कनोजियाने भाजपमध्ये वाजत-गाजत प्रवेश केला आहे. उत्तर प्रदेश भारतीय जनता पक्षाने सोनू कनोजियासाठी पायघड्या घातल्या आहेत. त्याच्यावर दरोडे, खून, अपहरण, खंडणी, खुनाचा प्रयत्न, जमीन बळकावणे असे शंभरावर गुन्हे दाखल आहेत व योगी सरकारने त्याच्या एन्काऊंटरचे आदेश दिले होते. आता हे सोनू महाशय भाजपमध्ये सामील झाले. सोनू महाशय यांनी शंभर अपराध केले, पण ते शुद्ध शाकाहारी असल्याचे प्रमाणपत्र सापडल्याने त्यांचे सर्व गुन्हे माफ करून त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला काय? हवे ते गुन्हे करून भाजपमध्ये या. फक्त तेवढे मटण खाऊ नका, असे मोदीभक्तांचे म्हणणे आहे," असा टोला ठाकरे गटाने लगावला आहे.

गोवा आणि ईशान्येकडे गायी कापल्या जातात व...

"इंडिया आघाडीवाले मटण खातात असे संस्कारी मोदी सांगतात, पण त्यांच्या संस्कारी भाजपने ‘बीफ’ म्हणजे गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून शेकडो कोटींचा निधी घेतला, हासुद्धा एकप्रकारे श्रावणातला मांसाहारच आहे. भ्रष्टाचार, अन्याय व लुटमार, हिंसाचार हा सदैव मांसाहारच असल्याचे शास्त्र सांगते व मोदी आणि त्यांचा पक्ष असा मांसाहार गेल्या दहा वर्षांत सतत करत आले. संस्कारी भाजपमध्ये एक कंगना नावाचे पात्र आहे. आपण गोमांस खात असल्याची कबुली तिने अनेकदा दिली व कंगना आता भाजपची लोकसभा उमेदवार म्हणून हिमाचल प्रदेशात निवडणूक लढत आहे. गोवा तसेच ईशान्येकडील काही राज्यांत भाजपची सत्ता आहे. त्या राज्यांत अधिकृतपणे गोमांस विक्री होते. गायी कापल्या जातात व तेथे श्रावणात मटण विक्री किंवा खाण्यावर बंदी नाही," असं ठाकरे गटाने म्हटलं आहे.

औरंगजेबाचा जन्म गुजरातमधील

"भारतीय संविधानाने नागरिकांच्या खाण्यापिण्यावर कोणतेही निर्बंध लावलेले नाहीत. पण ‘बीफ’ प्रकरणात भाजपच्या हिंसक टोळभैरवांनी अनेक निरपराध मुसलमानांचे ‘झुंड बळी’ म्हणजे ‘मॉब लिंचिंग’ केले तेव्हा पंतप्रधान मोदी यांनी साधी हळहळ व्यक्त केली नाही. मोदी यांचा निवडणूक प्रचार हा विरोधकांवर चिखलफेक आहे. त्यांच्याकडे मुद्दे नाहीत. विकासाचे लक्ष्य नाही व गेल्या दहा वर्षांत केलेल्या विकासकामांचा हिशोब नाही. मोदी हे पराभवाच्या भीतीने बहकत आहेत. त्यामुळेच ते विरोधकांवर पातळी सोडून बोलत आहेत. महिलांच्या बाबतीत भाजपचे संस्कार काय आहेत ते ‘जंतर मंतर’वर आंदोलनास बसलेल्या महिला कुस्तीगीरांच्या बाबत स्पष्टच दिसले. बिल्किस बानोवर बलात्कार करणाऱ्या आरोपींचा सत्कार करणारा संस्कार भयंकर आहे. प्रभू श्रीरामाचे मंदिर बांधले, पण रामाचे संस्कार भाजपने घेतले नाहीत. त्यामुळे तो श्रीरामही या वेळी मोदींना पावणार नाही. कार्यवाहक पंतप्रधान यांना संस्कार नव्हतेच, पण त्यांनी बोलताना ताळतंत्रही सोडले. औरंगजेबाचा जन्म गुजरातमधील दाहोद येथे झाला. मुघल साम्राज्याच्या बादशहाने जन्म घेण्यासाठी मोदींची जमीन निवडली. गेल्या दहा वर्षांत दिल्लीचा कारभार हा मुघल सल्तनतीपेक्षा कमी नाही. मातीचा गुण, दुसरे काय," असा टोला लेखाच्या शेवटी लगावण्यात आला आहे.