Prithvi Shaw: गुजरातविरूद्ध पृथ्वी शॉसोबत झाली चिटींग? थर्ड अंपायरच्या निर्णयाने मोठा वाद होण्याची शक्यता

Prithvi Shaw Out Controversy: झालं असं की, संदीप वॉरियरच्या बॉलवर नूर अहमदने पृथ्वी शॉला कॅच आऊट केलं. मात्र रिप्लेमध्ये असं दिसून आलं की, नूर अहमदने जेव्हा शॉचा कॅच घेतला बॉल आणि जमिनीचा संपर्क झाला.

सुरभि जगदीश | Updated: Apr 25, 2024, 10:23 AM IST
Prithvi Shaw: गुजरातविरूद्ध पृथ्वी शॉसोबत झाली चिटींग? थर्ड अंपायरच्या निर्णयाने मोठा वाद होण्याची शक्यता title=

Prithvi Shaw Out Controversy: क्रिकेटची लीग आणि अंपायर्सचे वादग्रस्त निर्णय हे काही नवीन नाहीत. सध्या आयपीएलचा 17 वा सिझन सुरु असून यंदाच्या वेळी देखील अंपायर्सच्या निर्णयांवर सातत्याने प्रश्न उपस्थित होताना दिसतायत. अशातच बुधवारी झालेल्या गुजरात टायटन्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्या सामन्यात देखील अंपायर्सच्या निर्णयावरून वाद झाल्याचं दिसून आलं. दिल्ली कॅपिटल्सचा ओपनर पृथ्वी शॉला बाद घोषित करण्यात आल्याने ही खळबळ उडाली होती.

पृथ्वी शॉच्या विकेटवरून रंगला वाद

झालं असं की, संदीप वॉरियरच्या बॉलवर नूर अहमदने पृथ्वी शॉला कॅच आऊट केलं. मात्र रिप्लेमध्ये असं दिसून आलं की, नूर अहमदने जेव्हा शॉचा कॅच घेतला बॉल आणि जमिनीचा संपर्क झाला. दरम्यान यावेळी मैदानावरील अंपायर्सने हा निर्णय थर्ड अंपायरकडे पाठवला.

सोशल मीडियावर व्हायरल झाला व्हिडीओ

शॉच्या विकेटचा निर्णय थर्ड अंपायरकडे सोपवला असता त्यावेळी थर्ड अंपायरकडूनही त्याच्या हाती निराशा लागली. थर्ड अंपायर्सने पृथ्वी शॉला आऊट करार दिला. या निर्णयानंतर पृथ्वी शॉसह दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांना धक्का बसला. चाहत्यांनाही अंपायरच्या निर्णयावर विश्वास बसत नव्हता.

थर्ड अंपायरच्या निर्णयावरून नवा वाद

थर्ड अंपायरच्या निर्णयाने नवा वाद होण्याची शक्यता आहे. यावेळी थर्ड अंपायरच्या निर्णयावर चाहते सोशल मीडियावर प्रश्न उपस्थित करताना दिसतात. या सामन्यात शॉ चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता पण या निर्णयामुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं. त्यामुळे आता यावरून मोठा गदारोळ माजण्याचीही शक्यता वर्तवण्यात येतेय. 

दिल्लीचा गुजरातवर निसटता विजय

या सामन्यात टॉस हरल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने 20 ओव्हर्समध्ये 224 रन्स केले. यावेळी कर्णधार ऋषभ पंतने 43 बॉल्समध्ये नाबाद 88 तर अक्षर पटेलने 66 रन्सची खेळी केली. प्रत्युत्तरात गुजरातच्या टीमला 220 रन्स करता आले. गुजरातकडून डेव्हिड मिलरने 55 तर साई सुदर्शनने 65 रन्स केले. गुजरातचा दिल्लीविरुद्धचा हा सलग दुसरा पराभव होता.